हजारो ग्रंथाचा ज्ञानरुपी ठेवा जतन करण्यात वाचनालयास यश
श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
मानवी आयुष्यात मनावर संस्काराचे रुजवणूक व जीवन मुल्यांची निर्मिती करण्यात ज्ञानरुपी ग्रंथ साहित्याचे अमूल्य योगदान असते .वाचना नुसार विचारांचा वारू सर्व क्षेत्रात संचार करतो .जन्मदात्री जननी , अक्षर रुपी सरस्वती चे दर्शन घडवणारे गुरू व जगातील ज्ञानाचे दर्शन घडवणारे ग्रंथ मानवी आयुष्याला कलाटणी देणारे घटक असतात .त्या ग्रंथाचा संग्रह करणारे वाचनालय हा एक अनमोल ठेवा आहे .श्रीवर्धन वाचनालय स्थापनेस 1 ऑगस्ट 2019 ला 126 वर्ष पूर्ण झाले आहे .त्या अनुषंगाने वाचनालय स्थापने पासून आजतगायत वाचनालयाची झालेली वाटचाल निश्चितच कौतुकास्पद आहे .श्रीवर्धन शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे .त्या ऐतिहासिक वास्तू मध्ये वाचनालयाचा समावेश असलेले श्रीवर्धन स्थित वाचनालय होय .
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात समाजात वाचनाचे महत्त्व निरंतर व स्थायी रुपात राहावे व वाचन संस्कृतीची जोपासना व्हावी याकरिता श्रीवर्धन वाचनालय सदैव तत्परतेने कार्यरत असल्याचे दिसून येते . 1 ऑगस्ट 1893 रोजी स्थापना झालेले श्रीवर्धन चे सार्वजनिक वाचनालय 1981 पर्यंत " ब " वर्ग तालुका ग्रंथालय होते. सन 2002 मध्ये वाचनालयास " अ " वर्ग मिळाला. स्वातंत्र्या पुर्वी स्थापन झालेल्या ह्या वाचनालयाचा खर्च तत्कालीन संस्थान सरकार आणि नगरपालिका यांचेकडू केला जात असे . फेब्रुवारी 1953 साली सार्वजनिक वाचनालयाची स्वतंत्र संस्था म्हणून नोंदणी झाली. आणि 1964 पासून सरकारी अनुदान मिळण्यास सुरुवात झाली. वाचनालयाची घटना व नियम 1968 साली तयार करण्यात आली. वाचनालयातर्फे मुंबई विद्यापीठ बहिःशाल शिक्षण केंद्र 1981 पासून चालवले जात असून केंद्राला अनेक मान्यवरांचा लाभ मिळाला आहे. वाचनालयातर्फे रायगड जिल्हा ग्रंथालय संघ व कोकण विभाग ग्रंथालय संघ यांची अधिवेशने घेण्यात आली आहेत.
1995 साली 7788 अशी ग्रंथ संख्या असणारे वाचनालय 2018 अखेर जवळपास 30,971 अशी मोठी ग्रंथ संख्या आहे . ग्रंथालयीन चळवळीतील विशेष कार्य व महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक , सांस्कृतिक जडणघडणीत केलेल्या कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाकडून श्रीवर्धन च्या ह्या वाचनालयास 11 मे 2006 साली सन्मानपत्राने गौरवण्यात आले आहे. शतायुषी ग्रंथालयांना विशेष निधी देण्याचा शासन निर्णय झाल्यानंतर 2006 साली सदर निधी वाचनालयास मिळाला आहे .
राजाराम मोहन रॉय लायब्ररी फौंडेशन ह्या कलकत्ता स्थित संस्थेने वेळोवेळी वाचनालयास मदत केली आहे. वाचनालय " अ " वर्गात यावे यासाठी साहित्यिक अरुण टिकेकर यांनी आपल्या संग्रहातील 500 पुस्तके भेट दिली, त्याचबरोबर अनेक दानशूर व्यक्तींनी देणगी व पुस्तक रूपात सहकार्य केल्यामुळेच वाचनालयास आजची भरारी घेणे शक्य झाले आहे. सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी निधी उपलब्ध करून दिला आहे.
वाचनालयातर्फे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीवर्धन वाचनालया मार्फत केले जातात .तरुण पिढीत वाचन संस्कृती रुजविण्यासाठी डॉ ए पी जे अब्दुल कलाम सर यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो त्या अनुषंगाने 2015 मध्ये शासनाने निर्णय घेतला आहे .आगामी काळात तंत्रज्ञाना सोबत तरुण पिढीला वाचनाची आवड पुर्ववत लागणे अगत्याचे आहे .त्या कारणे सर्वत्र वाचनालय चळवळ उभी राहणे आवश्यक आहे .

Post a Comment