आंबेत परिसरात रस्त्यांची स्थिती दयनीय


आंबेत परिसरात रस्त्यांची स्थिती दयनीय रस्त्यांची वर्कऑर्डर पडलीय धूळखात , नागरिकांचा जीव टांगणीला 

प्रतिनिधी म्हसळा
महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री स्व . अंतुले यांच्या मूळ आंबेत गावातील रस्त्यांचा प्रश्न अद्यापही नागरिकांना मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे . याकडे वारंवार लक्ष वेधूनही दुर्लक्ष होत आहे . गेल्या अनेक वर्षापासून आंबेत पंचक्रोशीमधील रस्त्यांसाठी अनेक पक्षांमार्फत निधी मंजूर होऊनही हा मिळालेला निधी केवळ नारळफोडीच्या कार्यक्रम  अखेरीस धूळखातच पडला आहे . पहिल्याच पावसात नागरिकांना रस्त्यांची नदी , तसेच गटार लाईन झाल्याचा अनुभव पाहायला मिळत आहे . मागील वर्षी आंबेत विचारेवाडी कोंड हा रस्ता महामार्गापासून ते वलजार वाडी अशाप्रकारे रस्त्यासाठी १२ लाख इतक्या निधीची तरतूद केल्याचे समजताच या शुभारंभासाठी नारळ फोडीचा कार्यक्रम म्हसळा तालुका भाजप कार्यकर्ते तसेच उपजिल्हा प्रमुख कृष्णा कोबनाक यांच्या वतीने करण्यात आला . त्यानंतर माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी देखील त्या ठिकाणी नारळ फोडला , पण मात्र आज पर्यंत या रस्त्याची बांधणी कोण करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे .  पावसाळा सुरु झाला तरी वर्कऑर्डर निघेना आणि रस्त्याची अवस्था जैसे थे परिस्थितीत राहून गेल्याने आंबेत पंचक्रोशीतील रस्त्यांची गंभीर समस्या भेडसावताना प्रचंड प्रमाणात दिसून येत आहे . या पंचक्रोशीतील जनतेला नेहमीच बनविले जात असल्याचा आरोप देखील राष्ट्रवादी युवक आंबेत गण उपाध्यक्ष विलास जांभळे यांनी केला आहे . 

आंबेत वलजारवाडी या ठिकाणी जाणाच्या नागरिकांना बोढणकोंड या ठिकाणी असलेला तीव्र चढ़ रस्ता हा पूर्णपणे वाहुन गेल्याने त्याठिकाणी एखादा अपघात होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे . तसेच त्याच ठिकाणी प्रवाशीवर्गाला उतरून बाकीचा उर्वरित प्रवास पायी चालत करावा लागत असल्याने वयोवृद्ध नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे . त्यामुळे अशा राजकारणातून समाजावर उमटणाच्या समस्यांवर अजून किती दिवस तोडगा चालत राहणार हा प्रश्न देखील वारंवार उद्भवताना दिसून येत आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा