श्रीवर्धनमध्ये जनतेचे देवाला साकडे : महादेवा . . पाऊस दे , शेतीवाडी पिकू दे

श्रीवर्धनमध्ये जनतेचे साकडे : पाऊस पडत नसल्याने नागरिक त्रस्त महादेवा . महादेवा . . पाऊस दे , शेतीवाडी पिकू दे 

संतोष सापते : श्रीवर्धन
कोकण आणि पाऊस हे जुने समीकरण आहे ; परंतु गेल्या दोन वर्षापासून पाऊस दडी मारत आहे . त्यामुळे कधी नव्हे ते कोकणात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे . गेल्या वर्षी दुष्काळाच्या झळा श्रीवर्धन तालुक्यातील जनतेला सहन कराव्या लागल्या आहेत . आता या वर्षी जून महिन्याची अखेर आली तरी देखील मान्सूनचा पाऊस पडत नसल्यामुळे श्रीवर्धनमधील नागरिकांनी महादेवाकडे पावसासाठी साकडे घालण्यास सुरवात केली आहे . वाढलेला उष्मा व श्रीवर्धन तालुक्यातील सद्यस्थितीत भीषण पाणीटंचाईमुळे जनता हैराण झाली आहे . तर एकीकडे बळीराजाचे देखील लक्ष आकाशाकडे लागलेले आहेत . शेतीची कामे पावसाअभावी रखडलेली आहेत . त्यामुळे सध्या समोर आलेल्या पावसाच्या संकटापासून मुक्तता मिळवण्यासाठी शहरातील व तालुक्यातील विविध भागातील मंडळी पावसासाठी देवाला साकडे घालत असून नजीकच्या सर्व मंदिरांमध्ये दिंडी काढण्यात येत आहे . श्रीवर्धन दांडा येथील मंडळींनी गेले चार दिवस सलग पाऊस मागण्यासाठी दिंडीला प्रारंभ केला आहे . त्यामागोमाग आता सर्वच भागातून पाऊस मागण्यासाठी दिंड्या काढल्या जात आहेत . या वेळी महादेवा . . . महादेवा . . . पाऊस . . . दे , शेतीवाडी . . . पिकू दे व पैशाला . . . पायली . . . मिळू दे . . . अशी विनवणी महादेवाकडे केली जात आहे . श्रीवर्धन दांडा येथील आबालवृद्ध व महिला अशी सर्व मंडळी रात्री १० . ३० वाजता दिंडी काढून श्रीवर्धनमधील जागृत देवस्थान श्री काळभैरनाथ मंदिर व मुळगाव येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे दिंडी घेऊन जातात . यावेळी भगवंताला आळवणारी विविध गीते म्हटली जातात . पाऊस पडला चिखल झाला , भिजला हरीचा वीणा मुखाने , विठ्ठल विठ्ठल म्हणा , देव निजला असला तरी करावा जागा अशी गीते बोलून भगवंताकडे लवकर पाऊस पाडण्यासाठी विनवणी ही मंडळी करताना दिसत आहेत . श्रीवर्धन तालुक्यात या आठवड्यात पाऊस न पडल्यास भात शेती करपण्याची शक्यता निर्माण झाली आहे . पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्यास रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा