72.20% गुण मिळवून अंकित विष्णू आग्रे प्रथम
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
मार्च 2019 च्या एसएससी बोर्डाचा शाळांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून म्हसळा तालुक्याचा एकूण निकाल 68% लागला आहे. तर तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात असलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित न्यु इंग्लिश स्कुल नेवरूळ हायस्कूलचा निकाल याही वर्षी 100% टक्के लागला असून म्हसळा तालुक्यात 100% निकाल लागलेली एकमेव शाळा म्हणून नोंद झाली आहे.
नेवरूळ हायस्कूल मधून इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 25 विद्यार्थी बसले होते त्यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या हायस्कूल मधे घुम, रुद्रवट, कोकबल, ठाकरोली, सांगवड, नेवरूळ, सकलप, वाडांबा या खेडेगावातील विद्यार्थी शिक्षण घेतात. मार्च 2019 च्या परीक्षेत हायस्कूलमधील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमधून रुद्रवट गावातील कुमार अंकित विष्णू आग्रे याने 72.20% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे तर सांगवड गावातील सुरज संदीप ठोंबरे याने 71.60% गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर सांगावड गावातील कुमार रोशन रवींद्र मोरे याने 69.60% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक होत असून तालुक्यात एकमेव 100% निकाल लागलेली शाळा असल्याने शिक्षकांच्या कामगिरीचे विशेष कौतुक होत आहे. तसेच नुकताच निकाल जाहीर झालेल्या बारावीच्या परीक्षेत सुद्धा याच नेवरूळ हायस्कूल मधे दहावी पर्यंत शिक्षण घेतलेल्या रुद्रवट गावातील कु.संदेश संतोष बोर्ले या विद्यार्थ्यांने 82 % गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला होता.
Post a Comment