मुरुडमध्ये पॅरा सेलिंग बेतले जिवावर; १५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू, वडील गंभीर जखमी


प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
मुरुड समुद्रकिनारी पॅरा सेलिंग करताना दोरी तुटल्याने १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. वेदांत गणेश पवार (वय १५) असे या मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून या दुर्घटनेत त्याचे वडील गणेश पवार हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पॅरा सेलिंग चालकाविरोधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यातील कसबा रोड येथे राहणारे गणेश पवार हे कुटुंबासह अलिबाग येथे फिरण्यास आले होते. समुद्र किनाऱ्यावर मौजमजा करत सुट्टीचा आनंद लुटत होते. मुरुड समुद्र किनाऱ्यावर गणेश पवार हे मुलगा वेदांतसह पॅरा सेलिंगसाठी गेले. पॅराशूट उंच झेपावल्यानंतर काही वेळातच दोर तुटले आणि दोघेही वरून खाली कोसळले. या दुर्घटनेत वेदांतचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गणेश पवार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मुरूड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलाचा मृत्यू झाल्याने पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. उन्हाळी सुट्टीनिमित्त फिरायला आलेल्या पवार कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा