म्हसळा एसटी डेपोचा कारभार रामभरोसे..!



वाहतूक नियंत्रकाची प्रवाशांना उडवाउडवीची उलट उत्तरे

● श्रीवर्धन आगार व्यवस्थापकांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नाही

● प्रवाशांमध्ये नाराजी

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

   रायगड जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या रामवाडी, पेण विभागीय कार्यालयाच्या नियंत्रणाखाली असलेल्या श्रीवर्धन आगाराच्या अखत्यारीत असलेल्या म्हसळा बसस्थानक मधे एसटी वाहतूक व्यवस्थेचा नेहमीच सावळा गोंधळ सुरू असल्याचे वारंवार घडत असून श्रीवर्धन आगार व्यवस्थापकांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने म्हसळा एसटी डेपोचा कारभार रामभरोसे असल्याची वस्तुस्थिती निर्माण झाली आहे या सर्व प्रकाराचा प्रवाशी वर्गाला नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. 
   श्रीवर्धन आगार व्यवस्थापक, म्हसळा वाहतूक नियंत्रक, ड्रायव्हर, कंडक्टर यांच्या हलगर्जीपणामुले प्रवाशी नागरिकांना नेहमीच मनस्ताप सहन करावा लागत असतो असे प्रवाशी वर्गाकडून सांगितले जाते.
  याबाबत अनेक वेळा प्रवाशांनी रा.प.महामंडळच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तसेच परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे तक्रारी करून ही कोणतीच कार्यवाही केली जात नाही किंवा प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेत नसल्याची माहिती समोर आली आहे.
   दि.30 मे रोजी श्रीवर्धन आगारातून सुटणाऱ्या मुंबई व बोरिवली या लांब पल्ल्याच्या नियमित गाड्या उशिरा येत होत्या तर काही गाड्या दोन ते अडीच तास उशिराने येत होत्या त्याचबरोबर म्हसळा डेपोतून सुटणाऱ्या लोकल फेऱ्यांच्या गाड्या देखील नियमित वेळेपेक्षा उशिराने सुटत होत्या. त्यामुळे बसस्थानकात तसेच स्थानकाच्या बाहेर उन्हात कित्येक प्रवाशी ताटकाळत उभे राहिले होते. गाड्या उशिरा येत असल्याबाबत व रिझर्वेशन केलेली गाडी नक्की कधी येईल याबाबत प्रवाशांनी वाहतूक नियंत्रक श्री.रमेश गोरेगावकर यांना विचारणा केली असता त्यांनी महिला प्रवाशांसह सर्वच प्रवाशांना उडवाउडवीची उत्तरे दिली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे या प्रकाराबाबत प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून वाहतूक नियंत्रक गोरेगावकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तर श्रीवर्धन आगार व्यवस्थापक रेश्मा गाडेकर या म्हसळा वाहतूक नियंत्रक रमेश गोरेगावकर यांच्या वर्तणुकीबाबत व या प्रकाराबाबत काय भूमिका घेतात याकडे सुद्धा तालुक्याचे लक्ष लागले आहे.

वाहतूक नियंत्रक रमेश गोरेगावकर यांनी प्रवाशांना दिलेली उलट उत्तरे :-

प्रवाशी - साहेब गाड्या वेळेत का येत नाही..?
वाहतूक नियंत्रक : मला माहित नाही श्रीवर्धनला फोन करून विचारा..

प्रवाशी - साहेब आम्हाला तक्रार वही द्या..?
वाहतूक नियंत्रक : आम्ही तक्रार वही ठेवत नाही.

प्रवाशी - मग आम्ही तक्रार कुठे करायची..?
वाहतूक नियंत्रक - मी उद्या रिटायर होणार आहे, तुम्हाला कुठे तक्रार करायची आहे ती करा....

प्रवाशी - विभागीय कार्यालयाचा फोन नंबर द्या..?
वाहतूक नियंत्रक : आमच्याकडे विभागीय कार्यालयाचा नंबर नाही.
अशा प्रकारे वाहतूक नियंत्रकाने प्रवाशांना उलट उत्तरे दिली.


 " मी माझ्या मुलांसह सकाळी साडेदहा पासून बसस्थानक मधे गाडीची वाट पाहत आहे परंतु दुपारी दोन वाजले तरी गाडी आली नाही याबाबत आधी माझ्या भावाने व काही वेळानंतर मी स्वतः कंट्रोलरना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन मी उद्या रिटायर होणार आहे. त्यामुळे तक्रार कुठे करायची असेल ती करा असे उलट उत्तर दिले.-श्रीवर्धन बोरिवली गाडीच्या महिला प्रवाशी

 " मी उद्या रिटायर होणार आहे. तक्रार करायची असेल तर करा. आमचे वरिष्ठ अधिकारीच लक्ष देत नाही. तक्रार वही आम्ही ठेवत नाही. आमच्याकडे पेण विभागीय कार्यालयाचा फोन नंबर नाही.
- श्री.रमेश गोरेगावकर, वाहतूक नियंत्रक म्हसळा डेपो


"म्हसळा बसस्थानकात घडलेल्या प्रकारची संपूर्ण माहिती घेते. तसेच वाहतूक नियंत्रक गोरेगावकर यांनी महिला प्रवाशांसह सर्वच प्रवाशी वर्गासोबत शांतपणे व सभ्यतेने बोलायला पाहिजे होते. जर गोरेगावकर यांच्या वर्तणुकी संदर्भात लेखी तक्रार केली तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू."
- श्रीमती रेश्मा गाडेकर, श्रीवर्धन आगार व्यवस्थापक

 "संबंधित प्रकारची संपूर्ण माहिती घेतली जाईल तसेच जर प्रवाशांनी लेखी तक्रार केली तर म्हसळा वाहतूक नियंत्रक गोरेगावकर यांची चौकशी करण्यात येईल.
- श्रीमती अनघा बारटक्के, म.रा.प.म.विभाग नियंत्रक रामवाडी रायगड जिल्हा

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा