म्हसळा ते इस्त्राईल व्हाया मराठी - व्यक्तिविशेष नोहा मस्सील



इस्राईल मध्ये राहून त्या देशात गेली ३८ वर्षे मराठी भाषा टिकवून ठेवणा-या नोहा मस्सील यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने भीमराव कुलकर्णी मराठी कार्यकर्ता पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वर्धापनदिनी पुणे येथे देण्यात आला. त्यानिमित्ताने नोहा मस्सील यांची ओळख 

मराठी भाषेचे पाईक : नोहा मस्सील

लेखक : अभय शरद देवरे

“माझ्या मराठीची बोलू कवतिके, अमृतातेही पैजा जिंके” असे श्री संत ज्ञानेश्वर माऊली म्हणून ठेवले आहे. याचा अर्थ असा की तराजूच्या एका पारड्यात मराठी भाषा टाकली आणि दुसऱ्या पारड्यात अमृत टाकले तरीही मराठी भाषेचे पारडे जड होईल. ही इतकी सुंदर भाषा आपल्याकडे अतिपरिचयात अवज्ञा झालेली असली तरीही असंख्य मराठीप्रेमी परदेशी लोकांनी आत्मसात केली आहे. मूळचे भारतीय पण आता इस्राईलमध्ये स्थायिक झालेले नोहामस्सील हे यापैकीच एक.
इसवी सन पूर्व ५८६ मध्ये बाबीलोन च्या राजाने जेरुसलेम वर हल्ला करून ते आपल्या ताब्यात घेतले आणि नृवंश  संहार केला त्या नंतर टायटस या रोमन सरदाराने हल्ला करून जेरुसलेम जिंकले आणि ज्यूंची मोठ्या प्रमाणात कत्तल केली. त्यातून जीव वाचवून असंख्य ज्यू शिडाच्या होडीतून देश सोडून वाट फुटेल तिकडे पळत सुटले. जिथे जमीन मिळेल तिथे राहण्याचा प्रयत्न केला. अनेक देशातील लोकांनी ज्युना तेथून हाकलून दिले. मग पुन्हा नव्या जागेच्या शोधात हे लोक आणखी भरटकले. असेच काही लोक अलिबाग जवळच्या नोगाव या बंदराच्या किनाऱ्याला लागले. आणि मग तिथून ज्यू लोकांचा पदस्पर्श भारतभूमीला झाला. भारतीयांनी मात्र या वेगळ्या देशातल्या, वेगळ्या संस्कृतीतल्या आणि वेगळ्या भाषेच्या लोकांचे अत्यंत मनापासून स्वागत केले. त्यांना रहायला जागा दिली आणि चरितार्थाचे साधनही दिले.तेलाचे घाणे उभारून तेल काढण्याच्या व्यवसायातून त्यांनी जगायला सुरुवात केली. अशीपाच दहा नव्हे तर दोन हजार वर्षे गेली. बेने इज्राइल म्हणजे इस्राइलचा सुपुत्र या नावाने सुपरिचित असलेले हे ज्यू धर्मीय भारतीय मातीशी पूर्णपणे एकरूप झाले. १९४८ मध्ये इस्राइल देशाची स्थापना झाली. आणि या देशाने जाहीर केले की दोन हजार वर्षापूर्वी परागंदा होऊन अनेक देशात विखुरलेल्या ज्युनी आता आपला स्वतःचा देश उभारण्यासाठी इथे यावे. त्यांना जागा आणि नोकरी देण्यात येईल. या आवाहनाला प्रतिसाद देऊन अत्यंत प्रखर राष्ट्राभिमानी असलेल्या ज्यूनी हळूहळू इस्राइल या देशात स्थाईक व्हायला सुरुवात केली आणि अत्यंत खडतर परिस्थितीतून स्वतःचा देश उभारला. 
नोहा मस्सील हे त्यातीलच एक. १९७० मध्ये त्यांनी भारत देश सोडून इस्राइल मध्ये प्रवेश केला. पण प्रवेश करताना त्यांनी आपली मराठी भाषा आणि मराठी संस्कृती ही तेथे वृद्धिंगत करण्याचे ठरवले. नोहा मस्सील यांचे संपूर्ण बालपण आणि तारुण्य महाराष्ट्रातच गेले. ते मूळचे कोकणातील म्हसळा या गावचे. गावाच्या नावावरून त्यांचे अगोदरचे आडणाव होते म्हसळेकर. मग कालांतराने ते मस्सील झाले. त्यांचे शिक्षण हे कोकणात पूर्ण मराठी माध्यमात झाले. त्यामुळे त्यांच्यावर पूर्णपणे मराठी संस्कार झाले. त्यानंतर ते इलेक्ट्रिकल इंजिनियर होऊन १९७० मध्ये आपल्या मातृभूमीची साद ऐकून इस्राइलमध्ये स्थायिक झाले.नोहा मस्सील  हे इंजिनियर असले तरी ते स्वतः मराठी साहित्यिक आहेत, कवी आहेत. त्यांची ४ पुस्तके आजवर प्रकाशित झाली आहेत
१९४८ नंतर इस्राइलने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जवळजवळ एकतीस हजार मराठी बांधव इस्राइलला गेले. त्या सर्व लोकांना बेने इस्राइल समाज असे नाव मिळाले.नोहा मस्सील यांनी या सर्व मराठी ज्यू बांधवाना एकत्र केले. आपली मराठी संस्कृती त्या परकीय भूमीत जपण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न केला. तिथे त्यांनी मायबोली या नावाचे मासिकही सुरू केले त्या मासिकात अनेक मराठी बांधव मराठी भाषेमध्ये व्यक्त होत असतात. कालांतराने मासिकाचे त्रैमासिक झाले. गेल्या ३२ वर्षांपासून आजही इस्राईलमध्ये प्रकाशित होणारे ते एकमेव मराठी त्रैमासिक आहे. जगभरातल्या ७२ देशातून स्थायिक झाले ज्यू बांधव इस्राईलमध्ये परतले. ते येताना तेथील भाषा तेथील संस्कृती बतीबर घेऊन आले होते. त्या लोकांनी आपल्या त्या त्या भाषेतील प्रकाशाने काढली. त्यायोगे त्यांना जगभरात काय चाललंय हे कळू लागले. शिवाय इस्राइलमध्ये हिब्रू भाषेत सर्व साहित्य उपलब्ध असल्याने आपल्या मराठी बांधवांना सुरुवातीला जगातील माहिती मिळू शकत नव्हती. मग नोहाजीनी तिथे ३२ वर्षांपूर्वी मायबोली हे मराठी मासिक सुरू केले. खरं म्हणजे इस्राइलमध्ये हिब्रू भाषा ही प्रयत्नपूर्वक जतन आणि संवर्धन केलेली भाषा आहे. मराठी भाषेचा तसा कोणताही संबंध तिथे नाही.तरीही नोहा मस्सील यांच्या प्रयत्नामुळे मराठी भाषेचे रोपटे १९७० मध्ये जे रुजवले, त्याचा आता वटवृक्ष होऊ पहात आहे. बेने इस्राईल समाजाच्या वतीने तिथे दरवर्षी मराठी भाषिकांचे संमेलन घेतले जाते. आपला एक मे हा महाराष्ट्र दिन येथे साजरा केला जातो. तेथील बांधव दिवसभर मराठी कार्यक्रम सादर करतात. आणि भारतातून बोलावलेला एखादा कलावंत आपली कला सादर करतो तसेच भारताच्या तत्कालीन राजदूताना किंवा तेथील एखाद्या मंत्रीमहोदयाना या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले जाते. या दिवशीचे भोजन सुद्धा पूर्ण मराठी पद्धतीचे असते. २०१७ मध्ये मला या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आणि एकपात्री प्रयोग करण्याचे सद्भाग्य मिळाले होते. श्री नोहा मस्सील यांनी खरोखरच मराठी प्रेमीना तिथे असेकाही एकत्र सूत्रात बांधले आहे की मी जणूकाही महाराष्ट्रातच आहे असे मला वाटत होते. सातासमुद्रापलीकडे त्या छोट्याशा परक्या देशात मराठी भाषा रांगते आहे हे पाहून आणि तिचे जतन आणि संवर्धन केले जात आहे हे पाहून आपली आपल्यालाच लाज वाटते. कारण आपण महाराष्ट्रात राहूनही मराठी बोलत किंवा वाचत नाही.  
केवळ १ मे हाच नव्हे तर इतरही मराठी सण तिथे साजरे केले जातात. त्यायोगे ही माणसे मराठी संस्कृतीची नाळ जोडून आहेत. 
ज्या ज्यूंचे बालपण भारतात गेले आहे त्यांना मराठी भाषेविषयी प्रेम असणे स्वाभाविक आहे पण पुढची पिढी, जी इस्राईल मधेच जन्माला आलेली आहे त्यांच्या मनात मराठी भाषा, महाराष्ट्र आणि पर्यटन भारताविषयी प्रेम उत्पन्न व्हावे म्हणून नोहा मस्सील यांनी "भारतीय बेने इस्राएल समाज, इतिहास परंपरा व प्रवास" हे पुस्तक सर्वप्रथम हिब्रू भाषेत लिहिले. नंतर ते इंग्रजी व मराठी भाषेतही प्रकाशित झाले. या पुस्तकाचे मराठी भाषांतर सातारा येथील साहित्यिक व चित्रपट निर्माते श्री अरुण गोडबोले यांनी करून दिले व प्रकाशीतही केले. ते वाचून इस्राएलमधल्या तरुणांना भारताला भेट द्यावीशी वाटते. 
नोहा मस्सील यांचे मराठी भाषा संवर्धनाचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांना भारताबद्दल अतीव प्रेम आहे कारण या देशातील विविधतेतील एकता, दुस-या व्यक्तीला सन्मान देण्याची वृत्ती ही त्यांना खूप भावते. वयाच्या 24 व्या वर्षी ते इस्राईलमध्ये गेले पण दरवर्षी आपल्या गावी ते जातात, जिथेजिथे मराठी साहित्यविषयक कार्यक्रम किंवा संमेलन घेतले जात असेल तिथे आवर्जून उपस्थित राहतात. आपल्या एका कवितेत ते म्हणतात ,

इस्राइल राष्ट्र गमावूनी विखुरलेले,
भारती आमुचे पूर्वज आलेl

आले नव्हते आक्रमक म्हणुनी, नव्हते आले व्यापारी बनुनी l
रमले इथे आश्रय मिळूनी,स्वदेश कधी न विसरलेले ,
भारती आमुचे पूर्वज आले l

सर्व धर्मीय मर्म शिकुनी, मानवतेला उराशी घेउनी l
राहिलो येथे इमान राखुनी, आज इस्राईल देशी परतलेले,
भारती आमुचे पूर्वज आले l

दोन खरे मित्रदेश मिळूनी आतंक्याना टाकूया जाळूनी l
जग आपुल्या येईल मागुनी,सत्याची सदा साथ धरलेले, 
भारती आमुचे पूर्वज आले l l


इस्राईल मध्ये राहून त्या देशात गेली ३८ वर्षे मराठी भाषा टिकवून ठेवणा-या नोहा मस्सील याना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने भीमराव कुलकर्णी मराठी कार्यकर्ता पुरस्कार आज पुणे येथे देण्यात येतो आहे . त्यांचे कार्य पाहून असे वाटते की हा पुरस्कार मिळणे हा त्यांचा अधिकारच आहे. 
मला तर वाटते की इस्राएल मध्ये राहणा-या प्रत्येक ज्यू बांधवाला असलेल्या फोन फुफुसांपैकी एकाचे नाव हिब्रू आहे तर दुस-याचे नाव मराठी आहे. त्यामुळे त्या देशात मराठी रुजते आहे, वाढते आहे ! ते पाहून महाराष्ट्रातील सर्व मराठी प्रेमींना आनंदाचे भरते आल्याशिवाय राहत नाही.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा