● स्वच्छता मोहिमेची ऐशी की तैशी
● दुर्गंधीने नागरिक हैराण
● रोगराई पसरण्याची भीती
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
स्वच्छतेच्या नावावर लाखो रुपये खर्च करणाऱ्या म्हसळा नगरपंचायतिच्या स्वच्छता मोहिमेचा बोजवारा उडत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. शहरात अनेक ठिकाणी गटारे उघडी आहेत तर या गटारातून सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने कित्येक महिने गटारे तुडूंब भरून राहिलेली असून गटाराच्या पाण्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तर तुंबलेली गटारे साफ करण्यासाठी नगरपंचायतच्या स्वच्छता विभागाला वेळच मिळत नाही की काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या नावाने डांगोरा पिटणाऱ्या नगरपंचायतचा कारभार रामभरोसे असून स्वच्छता मोहिमेची ऐशी की तैशी करून टाकल्याची वस्तुस्थिती शहरात पहावयास मिळत आहे. तर अस्वच्छता व दुर्गंधी वातावरणामुळे रोगराई पसरण्याची भीती नागरिकांमधून वर्तविली जात आहे.
तीन वर्षांपूर्वी म्हसळा ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मधे रूपांतर झाले आहे. प्रथमच झालेल्या निवडणुकीत शहरातील जनतेने मोठ्या विश्वासाने आणि खात्रीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातात एकहाती सत्ता दिली. कारण येथील नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा मिळतील या उद्देशाने एकहाती सत्ता दिली परंतु सर्वच बाबतीत सत्ताधाऱ्यांकडून येथील जनतेचा पुरता भ्रमनिरास झाला असल्याचे बोलले जात आहे. नगरपंचायतिच्या माध्यमातून अद्याप पर्यंत जनतेच्या हिताचे कोणतेही ठोस निर्णय घेण्यात आलेले नाहीत. तर दुसरीकडे मात्र सत्ताधारी नगरसेवकांना खुश ठेवण्यासाठी नगराध्यक्ष तीन वेळा बदलण्यात आले आहेत तर काही नगरसेवकांना विविध समित्यांवर बढती देण्यात आली आहे. एकहाती सत्ता असूनही सत्ताधाऱ्यांना जनतेच्या आरोग्याचे व येथील स्वच्छतेचे काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे व अतिशय ढिसाळ कारभार सुरू आहे.
काही महिन्यांपूर्वी स्वच्छतेचे संदेश देणारे सुविचार व स्लोगन शहरातील सरकारी कार्यालयांच्या भिंतींवर आणि इतर ठिकाणी लिहली आहेत परंतु याचा काहीच फायदा झालेला नाही. शहरातील कुंभारवाडा, तांबटआली, सानेआली, दिघी रोड नाका, एसटी स्टँड ते पंचायत समिती, मच्छी मार्केट, नगरपंचायत इमारत ते दिघीरोड नाका, पंचायत समिती, तहसील कार्यालय परिसर, पोलीस स्टेशन ते पाभरा फाटा, दिघी रोड मिनिडोअर व रिक्षा स्टँड, सर्व मोहल्ले, स्टेट बँक ऑफ इंडिया परिसर, एसटी स्टँड, ग्रामीण रुग्णालय अशा विविध परिसरातील गटारे उघडी असून कचरा व घाण सांडपाण्याने तुडुंब भरलेली आहेत.
गटाराच्या पाण्यात प्लॅस्टिकच्या बाटल्या, प्लॅस्टिक पिशव्या, दारूच्या बाटल्या, छोट्या मोठ्या गाड्यांचे टायर, वाया गेलेला भाजीपाला, सलूनच्या दुकानात कापलेले केस, हॉटेलमध्ये शिल्लक राहिलेला कचरा, त्याचबरोबर विविध टाकाऊ वस्तू टाकल्याने गटारे भरलेली आहेत. एकीकडे मात्र दर महिन्याला स्वच्छतेच्या नावाखाली नगरपंचायत लाखो रुपये खर्च करीत आहे तरीही स्वच्छतेच्या नावाने बोंबाबोंब असून उघडी गटारे आणि त्यात तुडूंब साचलेले सांडपाणी पाहून नगरपंचायत लाखो रुपये खर्च करते कुठे ? हा प्रश्न म्हसळा शहरातील नागरिक विचारीत आहेत. तर आता काही दिवसांनी पावसाळा सुरुवात होईल त्या अगोदरच गटारे साफ करणे गरजेचे आहे असे मत काही जाणकार व्यक्त करीत आहेत.
●● नागरिक व नगरपंचायत मधे स्वच्छतेबाबत समन्वय नाही...
नगरपंचायत मार्फत कचरा गोळा करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे व कचरा गोळा करणारी गाडी घेऊन कर्मचारी शहरात फिरत असतात परंतु काही नागरिक मोठ्या प्रमाणात घरातील कचरा उघड्यावर टाकत असल्याने त्याची योग्य विल्हेवाट लावली जात नाही तर हा कचरा गुरे, कुत्री खाऊन त्याची सर्वत्र नासधूस करतात आणि बऱ्याच वेळा हा कचरा उघड्या गटारात जाऊन साचून राहतो त्यामुळे गटारे सांडपाण्याने भरलेली आहेत. या सर्व प्रकारामुळे शहरातील नागरिक व नगरपंचायत मधे समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नगरपंचायतीने स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे गरजेचे आहे.
" म्हसळा शहरातील गटारे उघडी असून ती पाण्याने भरलेली आहेत याची कल्पना आहे. शहरातील स्वच्छता करणाऱ्या ठेकेदाराचे काँट्रॅक्त संपले आहे. आचारसंहितेमुळे नवीन ठेकेदार नेमलेला नाही. लवकरच नवीन ठेकेदार नेमून पावसाळ्यापूर्वी गटारे स्वछ केली जातील."
श्रीमती फलकनाझ हुर्जुक
नगराध्यक्षा - नगरपंचायत म्हसळा

Post a Comment