संजय खांबेटे म्हसळा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्रभरात 10 सभा घेऊन, भाजपप्रणित केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जनजागृती करणार आहेत. राज ठाकरे यांनी यासंदर्भात काल म्हणजेच गुढी पाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कातील मेळाव्यात जाहीरपणे सांगितले. त्यानंतर आज राज ठाकरे यांच्या पहिल्या टप्प्यातील सहा सभास्थळांची आणि तारखांची निश्चिती झाली आहे. सूत्रांनी यासंदर्भातील दिलेल्या माहीती प्रमाणे 14 एप्रिल ते 19 एप्रिल असा राज ठाकरे यांच्या प्रचारसभांचा पहिला टप्पा आहे.
रायगड लोकसभेतील पेण किंवा अलिबाग येथे शुक्रवार दिं .19 एप्रिल ला राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. 14 एप्रिलपासून राज ठाकरे यांच्या सभांचा धडाका सुरु होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात म्हणजे नांदेडमध्ये राज ठाकरे यांची पहिली सभा व या टप्प्यातील शेवटची सभा रायगड लोकसभेचे महाआघाडी साठी लढणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यासाठी रायगड मध्ये होणार आहे. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे कुठलेही स्थानिक पदाधिकारी मनसेच्या व्यासपीठावर नसणार असल्याचे समजते.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ पंतप्रधान मोदी , भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या बरोबरीनेच , राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावरही धडाडणार अशी शक्यता आहे.

Post a Comment