रानवली धरणाची पाणी पातळी घटली ; श्रीवर्धन शहरावर मे महिन्यात पाणीटंचाईचे संकट



श्रीवर्धन : प्रतिनिधी
मागील पावसाळ्यात जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने दमदार सुरुवात केली होती . पाऊस सुरु झाल्यापासून गणपती विसर्जन होईपर्यंत सातत्याने पडतो . मात्र पावसाळा संपता संपता हस्त नक्षत्राचा पाऊस न पडल्यामुळे यावर्षी मे महिन्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाई जाणवेल अशी चिन्हे दिसत होती . श्रीवर्धन शहराला पुरवठा करणारे एकमेव रानवली धरण असून , या धरणाची पाणी पातळी घटल्याने श्रीवर्धनसमोर पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे . श्रीवर्धन शहराला पुरवठा करणारे एकमेव रानवली धरण आहे . चाळीस ते पंचेचाळीस वर्षापूर्वी हे धरण पाझर तलाव पध्दतीने बांधण्यात आले होते . त्यावेळी श्रीवर्धन शहराची लोकसंख्या आत्ताच्या लोकसंख्येच्या निम्मी होती . त्यावेळी बीडाच्या धातूच्या जलवाहिन्या टाकलेल्या आता पूर्णपणे जीर्ण झाल्या आहेत . या धरणातून पाझरणारे पाणी जलवाहिनी द्वारे श्रीवर्धन शहरातील नागरिकांना पुरविण्यात येते . दोन वर्षापर्वी धरण आटले होते त्यावेळी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सांप्रदायाने धरणातील गाळ काढण्याचे अतिशय उपयुक्त असे काम केले होते . त्यामळे यावर्षी पाणीसाठा थोडातरी पहायला मिळतोय . श्रीवर्धन शहरात पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे . अनेक भागातील नागरिक नळाचे पाणी आवारातील झाडांना सोडताना दिसतात . या पाण्याचे करण्यासाठी अद्याप मुहूर्त सापडला नसला तरी धरणातून पाणी थेट नळाला येत असते . शहरातील बहुतांश नागरिक हेच पाणी पिण्यासाठी वापरतात . श्रीवर्धन नगरपरिषद पाणीपट्टीच्या पावतीवर सदरचे पाणी पिण्यायोग्य नाही असे लिहीत असलीतरी विहिरींचे पाणी मचुळ चवीचे असल्यामुळे नागरिकांचा नाईलाज आहे . परंतु मे महिन्यात नागरिकांना विहिरींचेच पाणी प्यावे लागणार आहे . नगरपरिषदेने अजूनही योग्य नियोजन केल्यास पाणी टंचाईची झळ कमी बसेल . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा