निवडणूकविषयक तक्रारींचा तत्काळ निपटारा करा : तंत्रज्ञानाची व्यवस्थित माहिती घेऊन वापरा - विभागीय आयुक्त डॉ जगदीश पाटील
संजय खांबेटे : म्हसळा
निवडणूक यंत्रणेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले संगणक आणि मोबाईलवरील विविध अॅप्लिकेशन्स यांची व्यवस्थित माहिती घेऊन त्याचा उपयोग केला पाहिजे. तंत्रज्ञान सर्वाना सहज उपलब्ध आणि सुलभ झाल्याने सोशल मिडीया किंवा इतर माध्यमातून निवडणूक काळात तक्रारींचा ओघ वाढणार असल्याने तत्काळ प्रतिसाद द्या असा संदेश कोकण विभागीय आयुक्त डॉ जगदीश पाटील यांनी आज दिला. ते आज सकाळी राजस्व सभागृहात निवडणूक यंत्रणेतील अधिकारी, नोडल अधिकारी यांच्याशी चर्चा करीत होते. प्रारंभी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली.
समन्वय ठेवणे खूप गरजेचे
विभागीय आयुक्त यावेळी म्हणाले कि, हि निवडणूक प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील पहिलीच निवडणूक आहे असे समजून काम करावे . सर्व पथकांनी एकमेकांत समन्वय ठेवणे खूप गरजेचे आहे. वरिष्ठ कार्यालयात तातडीने आणि वेळेत विविध निवडणूकविषयक अहवाल पाठविणे आणि तत्काळ प्रतिसाद देणे अत्यंत महत्वाचे आहे.
महिला मतदान केंद्र
जिल्ह्यात एक तरी संपूर्णपणे महिला अधिकारी व कर्मचारी नियुक्त असलेले महिला मतदान केंद्र असावे,याठिकाणी पोलीस संरक्षणही महिला पोलिसांनी द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दिव्यांगांसाठी सुविधा आवश्यकच
निवडणूक काळात आम्ही विभागीय आयुक्त सुलभता निरीक्षक ( एकसेसेबिलिटी ऑब्झर्वर) असणार आहोत. त्यादृष्टीने सर्व मतदान केंद्रांवर सर्वसामान्य मतदारांना तर सुविधा हव्यातच पण दिव्यांग मात्दाराना देखील मतदान करताना कोणतीही अडचण येऊ नये अशी व्यवस्था असावी, कुठलेही मतदान केंद्र सुविधांपासून वंचित असू नये असेहि ते म्हणाले.
आचारसंहिता भंग गंभीरपणे घ्या
आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या आणि तसे होत असेल तर तात्काळ दबाव न येऊ देता कारवाई करावी असे सांगून विभागीय आयुक्त म्हणाले कि, वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविली आहे परंतु त्यावरही सातत्याने लक्ष ठेवले पाहिजे. सोशल मिडीयावरील सर्व पोस्ट्स काळजीपूर्वक तपासल्या पाहिजेत तसेच आलेल्या तक्रारींवर लगेच कार्यवाही झाली पाहिजे. सुलभ, समाधान, सिव्हीजील अशी विविध अॅप्लिकेशन्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत, पुढे कदाचित आणखीही येतील. ती कशी हाताळायची याचे योग्य प्रशिक्षण घ्या अन्यथा मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागेल.
तक्रारींचा वाढता ओघ येऊ शकतो हे लक्षात घेऊन त्यांचे निराकरण लगेच करावे त्याचप्रमणे मतदार यादी अचूक व परिपूर्ण असण्यावर निवडणूक आयोगाने भर दिला असून याबाबतीतही मतदान नोंदणी अधिकारी यांनी काळजी घ्यावी असे ते म्हणाले
यावेळी अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ पद्मश्री बैनाडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी देखील सादरीकरण केले.

Post a Comment