म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
कोकणात होळीच्या सणाला खूप मोठे महत्व आहे. लहान थोरांपासून सर्वजण या उत्सवात गुण्यागोविंदाने सहभाग घेऊन होळीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करतात. यालाच शिमगा असेही म्हणतात. नऊ दिवस गावात होळीच्या मुख्य ठिकाणी सावरीचा झाड किंवा काही ठिकाणी आंब्याच्या फांद्या व त्यासोबतच गवत, पाळापाचोळा जाळून नऊ दिवस छोटी होळी साजरी केली जाते व दहाव्या दिवशी मोठी होळी म्हणून आंब्याच्या झाडाचे मोठे लाकूड आणून त्याला होळीच्या मध्यभागी उभे करून त्यासोबत सुकी लाकडे, गवत जाळून मोठी होळी साजरी करतात यालाच 'मोठा होम' असेही म्हणतात. पारंपारिक रितीरिवाजप्रमाणे होळीच्या ठिकाणी पुरणपोळी, गुळ, खोबरा, लाह्या असा नैवेद्य देवाला दिला जातो व त्याचाच प्रसाद म्हणून नागरिकांनाही दिला जातो.
कोकणात मागील दहा दिवसांपासून होळी उत्सव अतिशय उत्साहाच्या वातावरणात साजरा होत असून म्हसळा तालुक्यातील सर्व गाव वाडी वस्त्यांवर देखील हा शिमगोत्सव भक्तिमय व उत्साहाच्या वातावरणात साजरा होत आहे. बुधवारी मध्यरात्री मोठी होळी लावून या होळी पेटविण्याच्या पद्धतीची सांगता करण्यात आली. तर कालपासून होळीच्या पारावर सान भरणे ही प्रथा सुरू होते आणि ही प्रथा काही ठिकाणी तीन तर काही ठिकाणी पाच दिवस सुरू असते. म्हणजे या प्रथेनुसार नागरिक आपल्या घरातून पाच नारळांचा तोरण किंवा एक नारळ व अगरबत्ती देवाला वाहून देतात व घरात सुख शांती मागत असतात. अशी पद्धत सर्वत्र सुरू असते त्याचबरोबर गावात विविध वेशभूषा करून लहान थोर मंडळी राधा कृष्ण किंवा शंखासुर अशी भूमिका करून नाचत असतात तर काही गावात पालखी सोहळा आयोजित केलेला असतो आणि यामधे देवाची आरती, भजन गाऊन गावात असलेली इडापीडा दूर करण्यासाठी देवाला प्रार्थना करतात.
गावापासून नोकरी व्यवसाय निमित्ताने मुंबई, पुणे किंवा बाहेरगावी गेलेले स्थानिक नागरिक चाकरमनी म्हणून या शिमगोत्सवसाठी आपल्या गावात आतुरतेने हजेरी लावून पारंपारिक सणाचा आनंद लुटत असल्याचे दिसून आले. तसेच रंगपंचमी निमित्ताने विविध रंगांची उधळण करून अनेक तरुण-तरुणीनी आपले मित्र, नातेवाईक यांच्या सोबत रंगपंचमी उत्सव साजरा केला.
होळी व रंगपंचमी उत्सव साजरा करीत असताना तालुक्यात सर्वत्र शांततेत व भक्तिमय वातावरणात या शिमगोत्सवाची मजा सर्व नागरिकांनी लुटली आहे.
म्हसळ्यात सर्वत्र शांतता व भक्तिमय वातावरणात नागरिक होळीच्या सणाचा आनंद लुटत आहेत. सर्व गावातून एक गाव एक होळी अशी पद्धत असून गुण्यागोविंदाने सण साजरा होत आहे. तसेच कोणत्याही गावात कुठेही काही भांडणतंटा झाल्याच्या तक्रारी नाहीत. नागरिकांनी सर्व सण उत्सव अशाच शांतता व भक्तिमय वातावरणात साजरे करावेत.
-श्री.प्रविण कोल्हे, पोलीस निरीक्षक म्हसळा पोलीस ठाणे

Post a Comment