दिवेआगरच्या मंदिरात पुन्हा विराजमान होणार सुवर्ण गणेश


प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह । दिवेआगर
लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या दिवेआगरच्या मंदिरात पुन्हा एकदा सोन्याची गणेशमूर्ती विराजमान होणार आहे . वितळलेले सोने लवकरच न्यायालयीन बाबी पूर्ण झाल्यानंतर ट्रस्टच्या ताब्यात दिले जाईल , अशी ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली . त्यामुळे गणपतीच्या जयजयकाराने दिवेआगरचे मंदिर लखलखून जाणार आहे . २३ मार्च २०१२ रोजी दिवेआगरच्या मंदिरातील सुवर्ण गणेशाचा मुखवटा व रत्नजडित हिरे याची चोरी करण्यात आली होती . दरोडेखोरांनी या मंदिरावर दरोडा टाकून मुखवटा तर पळवलाच पण रखवालदाराचीही हत्या केली होती . हे प्रकरण राज्यात गाजले . दरोडेखोरांनी गणपतीचा सोन्याचा मुखवटा वितळवून ते विकण्याचा प्रयत्न केला . मात्र पोलिसांनी त्यांना पकडले . न्यायालयात हा खटला चालल्यानंतर १२ आरोपींना जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावली . आतापर्यंत हे सोने पोलिसांच्या ताब्यात होते . आता ते सरकारने स्वत : कडे घेतले असून लवकरच ट्रस्टकडे हे सोने सुपूर्द करण्यात येईल , अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली . सह्याद्री अतिथीगृहामध्ये याबाबत खास बैठक घेण्यात आली होती . यावेळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते , श्रीवर्धनचे माजी सभापती सुकुमार तोंडलेकर , सुजित तांदळेकर , सुवर्ण गणेश ट्रस्टचे अध्यक्ष गणेश पिळणकर आदी उपस्थित होते . या निर्णयामुळे लवकरच सोन्याची मूर्ती पुन्हा नव्याने मंदिरात बसवली जाणार आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा