नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हसळा नगरपंचायत चे कर्मचारी बेमुदत संपावर , शहरवासियांना कडाक्याच्या थंडीत असुविधांचा चटका


म्हसळा : सुशील यादव 
महाराष्ट्र राज्यातील नगरपालिका/नगरपंचायती मधील कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, सफाई कामगार, रोजंदारी कर्मचारी, अनुकंधारक यांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता न झाल्यामुळे त्या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करण्याकरीता राज्यातील ६० हजार कर्मचाऱ्यांसमवेत म्हसळा नगरपंचायत चे सर्व कर्मचारी नववर्षाच्या पहिल्याच दिवशीपासून बेमुदत संपावर गेले आहेत. या संपामुळे पाणी, काचारा व्यवस्थापन सुरळीत न झाल्यामुळे ऐन कडाक्याच्या थंडीत या असुविधांचा चटका म्हसळा शहरवासियांना बसला आहे. यामध्ये प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत: महाराष्ट्र राज्यातील नगरपालिका/नगरपंचायती मधील सर्व कर्मचार्यांना ०१ जानेवारी २०१८ पासून विना अट सातवा वेतन आयोग लागू करणे.  मुख्यमंत्र्यांनी याआधी दिलेल्या आश्वासनानुसार राज्यातील नगरपरिषद मधील १०/०३/१९९३ पूर्वीचे सर्व रोजंदारी कर्मचारी ३१ डिसेंबर २०१८ पूर्वी कायम करण्यात यावे तसेच म्हसळा सहित माणगाव , तळा, पोलादपूर या ग्रामपंचायती चे नगरपंचायत मध्ये रुपांतर होऊन चार वर्षे झाली आहेत परंतु वेळोवेळी मागणी करून देखील आजतागायत ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्यांचे नगरपंचायत सेवेमध्ये समावेशन करण्यात आलेले नाही ते महाराष्ट्र नगरपरिषद/नगरपंचायत औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ३४० खंड ०९ प्रमाणे करण्यात यावे यासारख्या अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यास राज्य सरकार विलंब करीत असल्याने म्हसळा नगरपंचायतसहित संपूर्ण राज्याचे चे कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. यामुळे जर हा संप लांबला तर नागरिकांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आजच जागोजागी घाणीचे साम्राज्य पहावयास मिळाले तसेच शहरवासीयांची पाण्यासाठी हि भटकंती होण्यास सुरुवात झाली आहे. सतत कचऱ्याचे ढीग साठले तर शहरात रोगराई पसरण्याची देखील भीती व्यक्त होत आहे. यावर आता राज्य शासन लवकरच काय तोडगा काढते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या संपामध्ये सुधीर म्हात्रे, अशोक सुतार, संतोष कुडेकर , हानिफ साने, प्रशांत करडे, विजय खताते, यांच्या सहित सर्वच कार्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे.

मला सेवानिवृत्त होण्यासाठी काही वर्षेच राहिली असताना आहे ती नोकरी टिकविण्यासाठी या वयात संघर्ष करावा लागत आहे यासारखा दुर्दैवी प्रसंग माझ्या आयुष्यात आला नाही. माझ्याबरोबर माझ्या सहकारी कर्मचाऱ्यांचे भावी आयुष्य देखील अंधारमय आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आम्हा कर्मचाऱ्यांचे लवकरात लवकर नगरपंचायत मध्ये समावेशान करावे.
-संतोष कुडेकर, नगरपंचायत कर्माचारी, म्हसळा    

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा