अरुण जंगम : म्हसळा
म्हसळा : ग्रामीण राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत म्हसळा तालुक्यातील नऊ गावांसाठी ६ कोटी १८ लाखांची तरतूद करण्यात आली आहे . यामुळे भविष्यात संबंधित गावांचा पाणीप्रश्न निकाली निघण्याची चिन्हे आहेत . तालुक्यात एकूण ८४ गावे वसलेली असून अंदाजे लोकसंख्या ५० हजारांच्या घरात आहे. तुरुंबाडी, काळसुरी , गोंडघर मोहल्ला , सुरई मोहल्ला , खारगाव ( बुद्रुक ) , मांदाटणे , केल्टे, उलकोंड , सोनघर , रेवली , बाडांबा , कोंझरी , ठाकरोली , पानवे , वावे या गावांना ग्रामीण राष्ट्रीय पेयजल योजनेचा फायदा होणार आहे. तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असले तरी कायमस्वरूपीच्या जलसाठ्यांचा अभाव आहे . तलाव , बंधारे यांची संख्या लोकसंख्येच्या तुलनेत नगण्य आहेत . तालुक्यात पाणीपुरवठ्यासाठी कोट्यवधींचे प्रकल्प प्रस्तावित असले तरी त्यांची कामे प्रलंबित आहेत . याचा फटका तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना बसत असून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे . तालुक्यातील वातावरण शेतीस पूरक असले तरी कायमस्वरूपी जलस्रोतांच्या कमतरतेमुळे शेतीउत्पादनाला फटका बसत आहे . म्हसळा तालुक्यात यंदा उन्हाळयात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती . या समस्येवर मीडिया ने वृत्त प्रकाशित करुन स्थानिकांच्या व्यथा मांडल्या होत्या . त्यानंतर दोन दिवसात संबंधित गावांमध्ये बोअरवेल करण्यात आल्या होत्या . म्हसळ्यातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हरिहरेश्वर येथे वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते . त्याचप्रमाणे दिवेआगार येथील सुवर्णगणेश मंदिरालाही ऐतिहासिक महत्व आहे येथील दिघी बंदराचाही झपाट्याने विकास होत असल्याने वाहतूक वाढली आहे . असे असले तरी पाण्यासाठी स्थानिकांना वणवण करावी लागते . आता तालुक्यात राष्ट्रीय पेयजल योजनीतर्गत ६ कोटी ८ लाखांचा निधी मंजूर झाल्याने स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत आहे आता या योजनेंतर्गत होणारी कामे लवकरात लवकर पूर्ण करावी , अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.

Post a Comment