म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आगारामधील एसटी चालक, वाहक व अन्य कर्मचारी वर्ग यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत असून संबंधितांच्या सेवेत हलगर्जीपणा होत असल्याने श्रीवर्धन आगाराच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या सेवा सुविधांचे वाभाडे निघत असून यामुळे नेहमीच नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची वस्तुस्थिती निर्माण झाली आहे. तसेच आगारातील वाहक, चालक व अधिकारी वर्गाच्या मनमानी व ढिसाळ कारभाराच्या अनेक वेळा तक्रारी करून देखील संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचेकडून दुर्लक्ष होत असून नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवली जात असल्याची चर्चा सुरू असून या मनमानी कारभाराला वरिष्ठ अधिकारीच खतपाणी घालीत असून अधिकाऱ्यांचा सुद्धा पाठिंबा असल्याचे नागरिक सांगत आहेत.
पेण-रामवाडी यांच्या नियंत्रणाखाली येणाऱ्या श्रीवर्धन आगारातून सुटणाऱ्या गाड्या वेळेत न सुटणे, रिझर्वेशन केलेल्या गाड्या रद्द करणे, वेळेपेक्षा दोन-तीन तास उशिरा येणे, हात दाखवुन गाडी न थांबविणे, भंगार अवस्थेत असलेल्या गाड्या, सतत ब्रेग डाऊन होणाऱ्या गाड्या अशा विविध तक्रारी असलेल्या श्रीवर्धन आगाराकडे लक्ष देण्यासाठी वरिष्ठ अधिकारी किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी असे कोणालाच वेळ नाही. त्यामुळे एसटी चालविणारे ड्रायव्हर व अन्य अधिकारी वर्गाला रानमोकळे झाले आहे.
हात दाखवा आणि एसटी थांबवा हे एसटी महामंडळाचे ब्रीदवाक्य असले तरी याचे पालन एसटी ड्रायव्हर करीत नसल्याचे अनेक वेळा श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव व पुढे जाणाऱ्या गाड्यांसाठी वाट पाहत उभे असलेल्या प्रवाशांना अनुभवायला मिळाले आहे. याचेच प्रत्यय दि.14 डिसेंबर रोजी तालुक्यातील देवघर येथील बसस्थानकावर उभे असलेल्या प्रवाशांना आला आहे. पेण विभागांतर्गत येणाऱ्या श्रीवर्धन आगाराची बोर्ली साई मार्गे मुंबई, बस क्र.2743 ही बस सकाळी 07:45 वाजता देवघर बसस्थानकावर आली असता उपस्थित प्रवाशांनी बस थांबविण्यासाठी हात दाखविला त्याच दरम्यान त्याच दिशेने एक ट्रेलरही जात होता त्याच ट्रेलरच्या उजव्या दिशेने जाणीवपूर्वक अडचणीच्या रस्त्याने जोरात ओव्हरटेक करून बस न थांबविताच व प्रवाशांना तसेच उभे ठेऊन माणगाव रस्त्याच्या दिशेकडे चालक सुसाट बस घेऊन निघून गेला. त्यामुळे प्रवाशी अनिल महामुनकर यांसह अन्य प्रवाशांना इच्छित ठिकाणी वेळेत पोहचता आले नाही अशी लेखी तक्रार अनिल श्रीधर महामुनकर यांनी म.रा.मार्ग परिवहन महामंडळ रायगड विभाग पेण-रामवाडी याना पत्राद्वारे करून संबंधित बस चालकाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मी व माझ्यासह अन्य प्रवाशीमित्र देवघर येथील बसस्थानकावर एसटी ची वाट पाहत उभे होतो. सकाळी श्रीवर्धन बोर्ली साई मार्गे मुंबई ही गाडी आल्यावर आम्ही हात दाखवून गाडी थांबविण्याची विनंती केली परंतु संबंधित ड्रायव्हरने गाडी न थांबविताच ओव्हरटेक करून दुसऱ्या बाजूने गाडी घेऊन निघून गेला. ड्रायव्हरच्या मनमानी व हलगर्जीपणामुळे आम्हाला इच्छित ठिकाणी पोहचता आले नाही त्यामुळे या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे.-श्री.अनिल श्रीधर महामूनकर, प्रवाशी
Post a Comment