म्हसळा : निकेश कोकचा
म्हसळा तालुक्यातील श्रीवर्धन मार्गावर असणाऱ्या नेवरूळ फाटा ते घूम मार्गावरिल रस्ता खचल्याची माहिती मिळताच सार्वजनिक विभागातील कर्मचाऱ्यानी काही तासांतच त्या रस्त्याची डागडुजी करून आपल्या तत्पर सेवेची झलक दाखवली.एरवी आपल्या कामचुकारपणामुळे सार्वत्रिक टिकेचे धनी असणाऱ्या बांधकाम विभागाने येथे तत्परता दाखवल्याने त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.
अनेक वर्ष रखडलेल्या नेवरूळ फाटा ते घूम रस्त्याला शासकीय मंजुरी मिळून मे २०१८ मध्ये या रस्त्याचे काम पुर्ण करण्यात आले. मात्र यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे या रस्त्याशेजारील असणारी साईड पट्टी वाहून गेली. पाण्याच्या दबावापुढे हा रस्ता देखील वाहून गेला असता मात्र ग्रामस्थानी या घटनेची माहीती सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली. सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यानी तत्काळ येऊन वाहून गेलेल्या भागामध्ये मोठमोठे दगड टाकून पाण्याचा प्रभाव कमी केला व हा रस्ता वाहून जाण्यापासून वाचवला. यामुळे या परिसरात असणाऱ्या अनेक गावांतील नागरिकांना दिलासा मिळाला असून त्यानी सा.बां विभागाचे कौतूक केले.

Post a Comment