घोणसे घाटात दरडीची टांगती तलवार ; संरक्षक भिंतीची दगडी निघण्यास सुरुवात, घाटातील प्रवास धोकादायक : बांधकाम खात्याचे दुर्लक्ष..


श्रीवर्धन प्रतिनिधी : संतोष सापते

मुंबई दिघी महामार्गावरील घोणसे घाट पावसाळ्यात प्रवाशी वाहतुकीसाठी धोकादायक  बनत आहे. घोणसे घाटाच्या दरड संरक्षक भिंतीचे दगड निघण्यास सुरुवात झाली आहे. परंतु बांधकाम खात्याचे त्या कडे दुर्लक्ष  झाल्याचे निदर्शनास येते आहे.
    म्हसळा शहराचे प्रवेशद्वार असलेला घोणसा घाट या पुर्वी अनेक व्यक्तीच्या मृत्यूचे कारण ठरलेला आहे .लहान व मोठया अनेक अपघाताची मालिका घोणसे घाटात निरंतर चालू राहिल्याने ठाणे दिवेआगार एस टी च्या अपघातानंतर   पूर्वीचा केळेवाडीचा  तीव्र   वळण रस्ता बदलून त्या ऐवजी  दुसऱ्या पर्यायी  रस्त्याची निर्मिती करण्यात आली .आजमितीस वापरात असलेला मुख्य रस्ताच्या वळणावर खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे .पर्यायी मार्गाची निर्मिती करतांना दरड संरक्षक साध्या दगडाची भिंत रस्त्याच्या डाव्या बाजूला बांधण्यात आली होती.आजमितीस त्या भिंतीचे अनेक छोटे छोटे दगड गळून पडलेले  निर्दशनास येत आहेत.वास्तविक पावसाळ्या पुर्वी   बांधकाम खात्याने सदर बाबीची योग्य दखल घेणे अपेक्षित होते.
  घोणसे घाट वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त व महत्वाचा आहे .श्रीवर्धन तालुक्यात प्रवेश करण्यासाठी घोणसे घाटा शिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही .श्रीवर्धन तालुक्यात पर्यटन व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत आहे .तालुक्यातील हरिहरेश्वर, दिवेआगार व श्रीवर्धन कडे आठवडा सुट्टी घालवण्यासाठी पर्यटकांचा ओघ सदैव चालूच आहे. त्या सोबत दक्षिण काशी असलेल्या हरिहरेश्वर ला भाविकांची गर्दी वाढतच आहे. त्यामुळे घोणसे घाट लाखो लोकांच्या जीवितांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे.पावसाळ्यात असंख्य पर्यटक निसर्गाचे मोहक दृश्य पाहण्यासाठी येतात .घोणसे घाटात अपघात प्रवण क्षेत्राचे नामनिर्देशन करणारे फलक क्वचित ठिकाणी निदर्शनास येतात . म्हसळ्या कडे जाताना घाटातील  लोखंडाचे संरक्षक कठडे तुटलेले आहेत .घाटातील मुख्य वळणावर सभोवतालच्या डोंगर माथ्यावरील पाणी झिरपतांना दिसते .वेळीच दखल न घेतल्यास मोठया अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही. संरक्षक भिंतीचे दगड बसवल्यास दरड कोसळण्याचा धोका कमी करण्यासाठी मदत होईल. श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यात या आठवड्यात पावसाने सर्वत्र थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक रस्ते ,घरे, महावितरणाचे खांब जमीनदोस्त झाले आहेत. विविध ठिकाणी दरडी कोसळल्या  आहेत .घोणसे घाट वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याने तात्काळ उपाय योजना करणे   आवश्यक आहे .
     माणगाव ते म्हसळा 27 किमीचे अंतर आहे .घोणसा घाटाची लांबी अंदाजे एक किमी आहे .घाटाच्या उजव्या बाजूस खोल दरी आहे .घाटाच्या लगतच   सुरुवातीला निवाचीवाडी व खाली पायथ्याला  केळेवाडी ही गावे आहेत .भविष्याच्या  व्यापारी दृष्टीने दिघी हे महत्वाचे गाव ठरत आहे .त्यामुळे दिघी स जोडणारा मुख्य दुवा घोणसे घाट आहे .
आज माणगाव ते दिघी या महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे .सदर चे काम चांदोरे गावाच्या हद्दीच्या जवळजवळ आले आहे.घोणसा घाटातील रस्त्याची झालेली वाताहत लवकर दूर व्हावी व दरड संरक्षक उपाय योजना लवकर करण्यात याव्यात अशी मागणी जनता करत आहे.
--------------------------------------------

घोणसा घाटातील रस्ता अतिशय खराब झाला आहे. त्यामुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. दरड कोसळल्यास सर्व वाहतूक ठप्प होईल .
   अभय कळमकर (विक्रम चालक )
--------------------------------------------

घोणसा घाटात आमच्या सर्व चालकांना सावकाश चालण्याचे आदेश देण्यात आले आहेत .घोणसा घाटातील मुख्य वळण रस्ता अतिशय खड्डेमय झाला आहे .त्याची लवकर दुरुस्ती होणे अपेक्षित आहे.
   सुधा विचारे (वाहतूक नियंत्रक म्हसळा स्थानक)
------------------------------------------

घोणसा घाटाची परिस्थिती अतिशय वाईट आहे . वळण रस्ता खचला आहे .दरड संरक्षक भिंतीचे दगड निघालेले आहेत .एकंदरीत परिस्थिती बघता बांधकाम खात्याचे पुर्ण पणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते आहे. सदर बाब बांधकाम खात्याने गांभीर्याने घ्यावी अन्यथा जनहितासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल .
  नाझीम हसवारे (  अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस)
-------------------------------------------

घोणसा घाटातील वळण रस्त्यावरील खड्डयांनी जीव मेटाकुटीला येत आहे .घोणसा घाट  तालुक्यातील सर्वात अवघड वळणाचा घाट आहे .बांधकाम खाते कसलीच काळजी घेत नाही .घाटात वाहन चालवताना फारच काळजी घ्यावी लागते .कारण या मार्गावर अनोळखी पर्यटक मोठया प्रमाणात येतात .
   संदीप गुरव (   एस महामंडळ    चालक)

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा