श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यात बोडणी घाट व घोणसा घाट दुर्लक्षितच : बांधकाम खाते सुरक्षे संदर्भात उदासीन

श्रीवर्धन व म्हसळा  तालुक्यात बोडणी घाट व घोणसा घाट दुर्लक्षितच : बांधकाम खाते सुरक्षे संदर्भात उदासीन

श्रीवर्धन प्रतिनिधी : संतोष सापते 
श्रीवर्धन व म्हसळा दोन्ही तालुक्याचे प्रवेशद्वारे असलेले बोडणी व घोणसा घाट प्रवासासाठी धोकादायक बनले आहेत .परंतु सरकारी यंत्रणेला त्याचे गांभीर्य नसल्याचे निदर्शनास येते आहे .
       बोडणी घाटात अपघाताची मालिका अखंड पणे निरंतर चालूच आहे . सन 2012 ते सन2018 पर्यंत विविध अपघातात अनेक लोकांना जीव गमवावा  लागलेला आहे .परंतु सार्वजनिक बांधकाम खात्यास त्याचे तीळमात्र गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होते .
      अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाय योजना मध्ये त्रुटी आढळत आहे .अपघात प्रवण क्षेत्रात सूचना फलकावर व्यतिरिक्त काहीच काम केल्याचे निदर्शनांस येत नाही .
श्रीवर्धन  हे नावारूपांना येणारे पर्यटन क्षेत्र आहे . श्रीवर्धन नगरपरिषद प्रत्येक महिन्याला सत्तर हजार रुपये पर्यटक निधी जमा करते .    महाराष्ट्रातील असंख्य पर्यटक श्रीवर्धन मध्ये हजेरी लावतात .मुंबई , पुणे  येथील पर्यटक आठवडा सुट्टीसाठी श्रीवर्धन ला पसंती देतात .त्या कारणे माणगाव शहरातून लोणेरे व साई मार्गे पर्यटक श्रीवर्धन कडे मार्गक्रमण करतात .    


माणगाव  साई मार्गे  श्रीवर्धन अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतर आहे . तर मुंबई गोवा महामार्गावरील लोणेरे पासून श्रीवर्धन पन्नास किलोमीटर अंतरावर आहे .पर्यायाने पर्यटक दोन्ही मार्गांचा अवलंब करतात .साई मार्गे श्रीवर्धन हमरस्त्यावर नाइटने ,घोणसा, तळवडे फाटा, जांभूळ,वडघर पांगलोली व बोडणी ही अपघात प्रवण क्षेत्र आहेत .वडघर पांगलोली व बोडणी या दोन्ही क्षेत्रात अपघाताचे प्रमाण वाढले आहे .  वडघरपांगलोली  ते जसवली आयटीआय हे सहा किलोमीटर अंतरावर तीव्र उतार आहे .नवीन येणाऱ्या वाहन चालकांना सहजासहजी अंदाज येत नाही .बोडणी घाटाच्या उजव्या बाजूला बापवली ,गुलदे , मामवली  ,निरंजन वाडी व मेघरे ही  गावे वसलेली आहेत .श्रीवर्धन च्या मुख्य रस्त्याला जोडून  या गावांचा रस्ता जोडलेला आहे .तुरळक वाहतूक मेघरे रस्त्यावरून होते .बोडणी घाटातील मुख्य वळणावर संरक्षण भिंतीची आवश्यकता आहे कारण येणाऱ्या वाहनास ब्रेक न लागल्यास किंबहुना रस्त्याच्या उताराची तीव्रता लक्षात न आल्यास वाहन सरळ दोनशे फूट खोल दरीत जाते .सदर मुख्य वळणावर असंख्य अपघात झाले आहेत .श्रीवर्धन मधील पर्जन्यमान लक्षात घेता पावसाळ्यात सदर रस्त्यावर अपघात ही नित्याची बाब ठरत आहे .सार्वजनिक बांधकाम खाते व इतर शासकीय यंत्रणा अपघातात संदर्भात कार्यप्रवणतेत  उदासीन दिसत आहे .


श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर हे दक्षिण काशी समजले जाणारे पवित्र तीर्थक्षेत्र आहे .पर्यटक व भाविक यांची सदैव गर्दी या ठिकाणी असते .बोडणी अपघात मालिका पर्यटन व्यवसायासाठी निश्चितच मारक  आहे .
बरोबर तीच परिस्थिती घोणसा घाटाची आहे .घोणसा घाटात दरड संरक्षक भिंतीची दगडे निघाली आहेत त्याच सोबत वळण रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाहन चालवताना अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. घोणसा घाटात एक बाजूस प्रचंड मोठी दरी आहे .त्यामुळे चुकून वाहन बाजूस उतरल्यास प्राणांतिक अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
म्हसळा शहराचे प्रवेशद्वार असलेला घोणसा घाट या पुर्वी अनेक व्यक्तीच्या मृत्यूचे कारण ठरलेला आहे .लहान व मोठया अनेक अपघाताची मालिका घोणसे घाटात निरंतर चालू राहिल्याने ठाणे दिवेआगार एस टी च्या अपघातानंतर   पूर्वीचा केळेवाडीचा  तीव्र   वळण रस्ता बदलून त्या ऐवजी  दुसऱ्या पर्यायी  रस्त्याची निर्मिती करण्यात आली .
  घोणसे घाट वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त व महत्वाचा आहे .घोणसे घाटात अपघात प्रवण क्षेत्राचे नामनिर्देशन करणारे फलक क्वचित ठिकाणी निदर्शनास येतात . म्हसळ्या कडे जाताना घाटातील  लोखंडाचे संरक्षक कठडे तुटलेले आहेत .घाटातील मुख्य वळणावर सभोवतालच्या डोंगर माथ्यावरील पाणी झिरपतांना दिसते .वेळीच दखल न घेतल्यास मोठया अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही. संरक्षक भिंतीचे दगड बसवल्यास दरड कोसळण्याचा धोका कमी करण्यासाठी मदत होईल. घोणसे घाट वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याने तात्काळ उपाय योजना करणे   आवश्यक आहे .

     माणगाव ते म्हसळा 27 किमीचे अंतर आहे .घोणसा घाटाची लांबी अंदाजे एक किमी आहे .घाटाच्या उजव्या बाजूस खोल दरी आहे .
श्रीवर्धन ते माणगाव 48 किमीचे अंतर आहे .सदर च्या रस्त्यावर मोर्बा ,नाइटने, डोंगरोली, साई ,चांदोरे ,घोणसा ,देवघर , म्हसळा , वाडबां ,जांभूळ , व वडघरपांगलोली ही मुख्य गावे येतात .त्या कारणे निरंतर वाहतुक चालू असते .48 किमी चे अंतर पार  करण्यासाठी चार चाकी वाहनास अंदाजे 2 तासांचा कालावधी लागतो .या वरून सदर वळण रस्त्याची वळण वाटेची कल्पना येते. माणगाव ते दिघी महामार्गाचे काम चालू असल्याने ठिक ठिकाणी मातीचे ढीग निदर्शनांस येत आहेत. त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते आहे  त्या सोबत अपघातास निमंत्रण मिळण्याची दाट  शक्यता आहे.
-------------------------------------------

ठेकेदार व सरकारी अधिकारी यांची अभद्र युती असल्याने घाट रस्त्याची दुरवस्था झाली आहे .बोडणी व घोणसा दोन्ही घाट श्रीवर्धन च्या रहिवाशी वर्गासाठी महत्वाचे आहेत .त्यामुळे सरकारने तात्काळ सदर घाटाची दुरूस्ती च्या अनुषंगाने हालचाली कराव्यात .
-संजीव डेगवेकर (नागरिक श्रीवर्धन )

श्रीवर्धन ते माणगाव रस्त्यावर अनेक वळणे आहेत .विशेषतः बोडणी व घोणसा घाट वाहन चालकांना त्रासदायक ठरत आहे .कारण सदर च्या घाटातील रस्त्यावर असंख्य खड्डे आहेत त्याच सोबत अपघात प्रवण क्षेत्रात आवश्यक बाबींचा सर्वत्र अभाव आहे. घाटातून वाहन चालवताना चालकावर जीव मुठीत धरावा लागत आहे .
- अविनाश कोळंबेकर (अध्यक्ष चालक मालक रिक्षा संघटना श्रीवर्धन )

श्रीवर्धन हे पर्यटकांना आकर्षित करणारे शहर आहे त्यामुळे सदैव माणगाव म्हसळा मार्गे अनेक पर्यटक येतात .परंतु घोणसा व बोडणी घाटातील परिस्थिती बघितल्या नंतर निश्चितच त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होते. त्या कारणे बांधकाम खात्याने लवकरात लवकर सदर घाटातील उणीवा दुर कराव्यात ही विनंती.
- राजेंद्र भोसले (व्यापारी श्रीवर्धन)

 बोडणी घाटात आजपर्यंत अनेक अपघात झाले आहेत परंतु बांधकाम खाते त्या कडे दुर्लक्ष करत आहे .वेळीच घाटातील उणीवा दूर करण्यात याव्यात अन्यथा जनतेत असंतोष निर्माण होईल त्यास बांधकाम खाते जबाबदार असेल
-गणेश पोलेकर (   युवा राष्ट्रवादी पदाधिकारी श्रीवर्धन )

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा