खेळाडूंचा हिरमोड; लोकप्रतिनिधींसह स्थानिक प्रशासनालाही विसर
प्रतिनिधी : म्हसळा
म्हसळा तालुक्याचा क्रीडा विकास होण्यासाठी राज्य सरकारने तालुका क्रीडासंकुले उभारण्याचा निर्णय घेतला . या बंदीस्त क्रीडासंकुलांमुळे एकाच ठिकाणी विविध खेळांच्या सुविधा मिळतील आणि प्रशिक्षीत मार्गदर्शकांची साथ मिळेल , ही अपेक्षा होती ; परंतु सहा वर्षे झाली तरीही म्हसळा तालुक्यातील क्रीडासंकुलाला पूर्ण स्वरुप मिळू शकले नसल्याने खेळाडूंसह क्रीडाप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे मनुष्यबळ हे विकासाचे एक प्रभावी साधन म्हणून शिक्षण ही बाब अत्यंत महत्वपूर्ण ठरते ; परंतु शिक्षणाबरोबरच क्रीडा , शारीरिक शिक्षण व युवक कल्याण विषयक उपक्रमांसाठी जागृती निर्माण व्हावी व क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जावा , त्याचप्रमाणे राज्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध होऊन ग्रामीण भागातील होतकरु मुलांना खेळात नैपुण्य प्राप्त करण्याच्या संधी उपलब्ध व्हाव्यात , या उद्देशाने क्रीडा संकुलाचे धोरण अस्तित्वात आले . त्याच अनुषंगाने सहा वर्षांपूर्वी २०१२ मध्ये महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत तत्कालीन आ. सुनील तटकरे यांच्या हस्ते या क्रीडासंकुलाचे भूमीपूजन करण्यात आले होते . सुमारे एक कोटी रुपयांच्या खर्चानंतर हे क्रीडासंकुल उभे राहणार होते . त्यामुळे तालुक्यातील क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण होते प्रतीक्षेनंतर आता तरी प्रशिक्षीत मार्गदर्शकांचे मार्गदर्शन मिळणार , अशी अपेक्षा खेळाडूंना होती . मात्र सहा वर्षांनंतरही हे क्रीडासंकुल अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहे एकीकडे क्रीडासंकुलाची इमारत उभी राहत असताना खेळाडू प्रतीक्षा करीत असलेले क्रीडांगण अद्यापही तयार करायचे असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे या क्रीडासंकुलाचे काम येणाऱ्या वर्षांमध्ये तरी होईल , अशी आशा खेळाडू , क्रीडाप्रेमींना आहे . मात्र लोकप्रतिनिधींसह स्थानिक प्रशासनालाही याचा विसर पडल्याने हे क्रीडासंकुल अद्यापही अपूर्ण अवस्थेत असल्याचे स्पष्ट होत आहे .
शासनस्तरावरुन कामाचा सदर क्रीडासंकुलाच्या कामाचा पाठपुरावा चालू असून लवकरात लवकर काम पूर्ण होईल . अवधूत तटकोरे , श्रीवर्धन मतदार संघ
ठेकेदारास असलेल्या सर्व अडचणी मध्यस्ती करनन दूर केलेल्या आहेत . मैदान तयार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सविस्तर चर्चा झाली असून येत्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वी या क्रीडासंकुलाचे काम पूर्ण करण्याचा मानस आहे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी याचे लोकार्पण करण्याच्या दृष्टीने या क्रीडासंकुलाचे काम होईल .
- महादेव करुणावडे , जिल्हा क्रीड़ा अधिकारी

Post a Comment