मुंबई - गोवा महामार्गावरील दरोड्याचा निकाल : आरोपींना सात वर्षांची सक्तमजुरी, माणगाव पोलिसांचा यशस्वी तपास.
श्रीवर्धन : श्रीकांत शेलार
मुंबई गोवा महामार्गावर ऑगस्ट 2015 मध्ये घडलेल्या गुन्ह्यात पाचही आरोपीना सात वर्षांची सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.घटनेच्या दिवशी तक्रारदार मानिनाल दोषी व त्यांच्या पत्नी हे दोघे गोरेगाव येथून मुंबई जात होते. त्यावेळी रात्री मौजे रातवड गावाच्या हद्दीत आरोपींनी तांदळाच्या बाचक्यासारखे गठडी ठेवली होती. त्यामुळे दोषी यांच्या चालकानीं गाडी थांबवली असता आरोपींनी त्यांच्या कारवर माती व वाळू फेकून फिर्यादी व साक्षीदार यांना काठी व लाथा बुक्क्याने मोठया प्रमाणावर मारहाण केली होती. त्यावेळी आरोपींनी तक्रारदार यांचे सोन्या चांदीचे दागिने, कॅमेरा व मोबाईल असे एकूण एक लाख नऊ हजारांचा मुद्देमाल चोरला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी अमरजित हरिश्चंद्र यादव हा कोलाड येथे राहत होता व उर्वरित आरोपी लक्ष्मण हिलम, सुनील मारुती पवार, लक्ष्मण पवार, नितेश उर्फ डॅनी बारक्या वाघमारे हे पेण आदिवासी वाडी येथील रहिवाशी आहेत.
माणगाव येथील जलदगती न्यायालयात याबाबत सुनावणी होत होती. अति. सहजिल्हा न्यायाधीश टी एम जहागीरदार यांनी हा निकाल दिला. सरकारी वकील जितेंद्र म्हात्रे व अमित देशमुख यांनी प्रभावीपणे युक्तिवाद करून आरोपींना शिक्षेस पात्र केले. माणगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे यांनी गुन्ह्याचा तपास अतिशय कौशल्येतेने केला. पोलीस निरीक्षक ए बी लेंगरे, पोलीस उप निरीक्षक एन एन वारे, पोलीस कर्मचारी प्रमोद लांगे, राजेंद्र म्हात्रे, अविनाश पाटील, मनीष ठाकूर, अल्पेश पवार तसेच पोलीस उप निरीक्षक पि के जाधव व एस डी कासार यांनी तपास कार्यात मदत केली.
दरोड्याची घटना हा निर्जनस्थळी झाली होती. आजूबाजूला जंगल परिसर आहे. घटनास्थळी फक्त एक टोपी सापडली होती. फिर्यादीचा मोबाईल ही चोरीला गेला होता. काही दिवसांनी मोबाईल सुरू झाल्याने पेण येथील एका आरोपीला आमच्या पोलिसांनी पहाटे अटक केली. इतर फरार आरोपींना बारामती येथून अटक करण्यात आली. फिर्यादी दोषी यांनी देखील चांगलं सहकार्य केले. गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाया केल्या जात आहेत. तसेच प्रतिबंधात्मक कारवायांवरही आमचा जोर आहे.
- दत्ता नलावडे, उपविभागीय पोलिस अधिकारी - माणगाव.

Post a Comment