रायगड लोकसभा राष्ट्रीय कॉग्रेस स्वबळावर लढणार... माणगाव आढावा बैठकीत कार्यकर्त्यांचा एकमुखी निर्धार....

रायगड लोकसभा राष्ट्रीय कॉग्रेस स्वबळावर लढणार...
माणगाव आढावा बैठकीत कार्यकर्त्यांचा एकमुखी निर्धार....

माणगाव : प्रवीण गोरेगांवकर

राज्यात काहीही ठरो रायगडात लोकसभा कॉग्रेस स्वबळावरच लढण्याचा एकमुखी निर्णय घेत आगामी लोकसभा निवडणूकीत स्वबळावर लढण्याचे रणशिंग कॉग्रेस कार्यकर्त्यांनी फुंकले आहे. जिल्हयातील कॉग्रेस कार्यकर्त्यांची आढावा बैठक बुधवार ता. 11 एप्रिल रोजी दुपारी पार पडली. त्यावेळी या बैठकीला राष्ट्रीय कॉग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार, जिल्हा चिटणीस उदय कठे, कार्यालयीन चिटणीस प्रभाकर राणे, रोहा तालुकाध्यक्ष मारूती देवरे, म्हसळा तालुकाध्यक्ष डॉ. मुईन शेख, पोलादपूर, तालुकाध्यक्ष अजय सलागरे, महाड तालुकाध्यक्ष राजेंद्र कोरपे, माणगाव तालुकाध्यक्ष विलास सुर्वे, माणगाव तालुका महिलाध्यक्षा किर्ती शिंदे, ज्येष्ठ नेते सुरेश मोहिते, सुनिलदत्त चव्हाण, माजी ग्रा.पं.सदस्य काशिराम पवार, बाळा मांजरे यांच्यासह रायगड जिल्हयातील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

माणगाव येथे राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत आमचे नेते स्व. बॅ. ए.आर. अंतुले यांचा बालेकील्ला असलेल्या 32 रायगड लोकसभा मतदार संघात राष्ट्रीय कॉग्रेसची ताकद मोठी आहे. अंतुले यांनी या मतदार संघात भरीव अशी विकासकामे केली आहेत. अनेक जनहितार्थ प्रकल्प मार्गी लावले. त्यामुळे रायगड लोकसभा निवडणूक ही राज्यात महत्वाची मानली जाते. मागील लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी कॉग्रेस बरोबर राष्ट्रीय कॉग्रेस होती. तेव्हा सुनील तटकरेंचा 2100 मतांनी पराभव झाला. मात्र त्याच कॉग्रेसला राष्ट्रवादी कॉग्रेसने रायगडात संपविण्यासाठी विडा उचलला. राष्ट्रवादी कॉग्रेस आणि शेकाप यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी युती केली. मात्र आपल्या मित्र पक्षाचा विचारच राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने केला नाही उलट कॉग्रेसला संपविण्याचेच काम केले. याबाबत जिल्हयातील कॉग्रेस कार्यकर्त्यांत कमालीचा संताप खदखदत आहे. या संतापाला वाट आज या माणगाव येथील बैठकीत कॉग्रेस करुन देत आ. सुनिल तटकरेंनी केलेल्या सुडाच्या राजकारणाचा पाढाच वाचला.

      या बैठकीत आगामी लोकसभा निवडणूक कॉग्रेसने लढवावी याबाबत कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या. राष्ट्रीवादी कॉग्रेसने रायगड जिल्हयात विविध निवडणूकात कॉग्रेसच्या मतांवर डोळा ठेवून युती केली. मात्र कॉगे्रसच्या वाटयालाा कायम उपेक्षा आली. युतीच्या नावाखाली स्वत:चीच पोळी भाजत आपलेच उमेदवार विधानसभा लोकसभेसाठी उभे केले आणि कॉग्रेसला मात्र युतीच्या नावाखाली फरफटत नेले. वास्तविक आमचे नेते बॅ. ए.आर. अंतुले यांचा रायगड हा बालेकिल्ला असताना कॉग्रेसला सुनिल तटकरेंनी संपविण्याचे काम केले. याबाबत कार्यकर्त्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या निवडणूकीत देशात राज्यात कॉग्रेस व राष्ट्रवादी युती बाबत काहीही ठरो रायगडची लोकसभा कॉग्रेस स्वबळावर लढणार हा ठाम निर्धार या बैठकीत घेण्यात आला. हा ठराव कॉग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे पाठवून त्यांची भेट घेवून मांडला जाणार आहे. यावर अशोक चव्हाण यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार न केल्यास अशोक चव्हाण यांना घेवून थेट आखिल भारतीय कॉग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेवून रायगड जिल्हयात कॉग्रेस ठेवायची कि संपवायची? हा सवाल करणार आहेत. या बैठकीत शेवटी प्रदेश कॉग्रेस कमिटीचे सरचिटणीस माजी आ. माणिकराव जगताप तसेच रायगड जिल्हा कॉग्रेस महिला अध्यक्षा अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर यांची कॉग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारीणीवर सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर, ज्ञानदेव पवार, मारूती देवरे, अजय सलागरे, डॉ. मुईन शेख आदि मान्यवरांनी विचार मांडले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा