अर्थसहाय्य देऊन लहान व्यवसाय उद्योगांच्या उभारणीला चालना देणे या हेतूने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुद्रा योजना सुरु केली आहे. रायगड जिल्ह्यात या योजने अंतर्गत आधिकाधिक तरुणांना स्वयंरोजगाराकडे वळविण्यासाठी योजने संदर्भातील जनजागृतीवर भर द्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी आज येथे केले.
जिल्हास्तरीय मुद्रा बँक समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पार पडली. जिल्हाधिकारी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक ए.एम.नंदनवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, समितीचे अशासकीय सदस्य सतिश धारप, कल्पना दास्ताने, मिलिंद पाटील, अक्षय ताडफळे, नितीन कांदळगावकर, कल्पना राऊत, राजेंद्र राऊत तसेच जिल्हा ग्रामीण यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी रामदास बघे, जिल्हा उद्योग केंद्राचे प्रभारी व्यवस्थापक बी.आर.पाटील, संजय वर्तक आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सुर्यवंशी म्हणाले की, बँकेच्या अधिकाऱ्यांसाठी मुद्रा योजने संदर्भात उद्बोधन वर्ग आयोजीत करणे, उत्तम कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांचे सत्कार करणे या सारखे प्रयत्न व्हावेत. मुद्रा योजने अंतर्गत कोणत्या व्यवसायांसाठी कर्ज उपलब्ध होऊ शकते यासाठी मिटकॉन व अन्य संस्थांकडून व्यवसाय निहाय प्रकल्प अहवालांचे नमुने प्राप्त करणे, तालुका निहाय मेळाव्यांचे आयोजन करणे, तसेच रेडिओ, केबल टि.व्ही. च्या माध्यमातून योजनेची माहिती प्रसारीत करणे आदि उपाय योजना राबवाव्या असे उपाय यावेळी उपस्थितांनी चर्चे दरम्यान सुचविले.
एप्रिल पासून मेळावे घेण्याचे नियोजन करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देशित केले. यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात आता पर्यंत 15 हजार 362 जणांना 186 कोटी 23 लाख रुपयांचे अर्थसहाय्य मुद्रा योजने अंतर्गत मंजूर करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले.

Post a Comment