घुम - वार्ताहर, श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा तालुक्यातील कोकबल, ठाकरोली, सांगवड ही गावे अत्यंत दुर्गम व
डोंगराळ भागात आहेत. या गावांना तालुक्याला जोडणारा मुख्य रस्ता जिल्हा
परिषद अंतर्गत आहेत. परंतु या रस्त्याची आजमितीला झालेली दुरावस्था पाहून
या भागात खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य किंवा अन्य लोकप्रतिनिधी आहेत
की नाही अशी शंका निर्माण झाली आहे. कोकबल ते घुम फाटा पर्यंत कोकबल
ग्रामस्थ व महिला मंडळ यांनी दि.09 नोव्हेंबर रोजी श्रमदान करून स्वकष्टाने
या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम केले आहे. यावेळी उपस्थित महिला व
पुरुष मंडळी यांनी सर्व पक्षीय नेते व लोकप्रतिनिधी यांचा निषेध केला. तर
वृद्ध महिलांनी सांगितले की आम्ही आमच्या मुलाबाळांचा प्रवास सुखाचा होवो व
एस टी गाडी बंद होऊ नये यासाठी खड्डे भरायला आले आहोत. यावेळी श्रमदान
करताना महिलांच्या चेहऱ्यावर दुःखी अश्रू दिसून येत होते तर आम्ही मतदान
करुन आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य निवडून देऊन
कोणते पाप केले आहोत का असा सवाल वृद्ध महिला करीत होत्या.
>
> या भागातून प्राथमिक शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा,
महाविद्यालयीन विद्यार्थी असे 150 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षणासाठी
नेवरुळ व म्हसळा येथे जातात. शासकीय कामासाठी, नोकरी व्यवसायानिमित्त,
दैनंदिन जीवनावश्यक वस्तु खरेदी करण्यासाठी एकमेव बाजारपेठ म्हणजे
तालुक्याचे ठिकाणी नागरिक रोज मोठ्या प्रमाणात येत असतात. चांगल्या
रस्त्याच्या सुविधेपासुन गेली कित्येक वर्ष या भागातील ग्रामस्थ वंचित असून
ग्रामस्थांना बाजारहाट व इतर दैनंदिन व्यवहारासाठी म्हसळ्या शिवाय अन्य
दूसरा कोणताही पर्याय नाही. एस.टी.च्या प्रवासा व्यतिरिक्त अन्य कोणत्याही
प्रकारची सुविधा नसल्यामुळे सर्व दारोमदार फक्त एस.टी.वरच अवलंबून आहे.
सद्यस्थितिला या रस्त्यावर खुप मोठे मोठे खड्डे पडल्याने व ही परिस्थिती
गेली कित्येक वर्ष अशीच असल्याने या भागातील ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी
सहन करुन जीव मुठीत धरून प्रवास करीत असल्याचे वास्तव चित्र या भागात
पाहायला मिळत आहे. सांगवड, ठाकरोली, कोकबल या गावात प्राथमिक शाळेत
शिकवायला जाणाऱ्या शिक्षकांना रोज या खडतर मार्गावरून प्रवास करावा लागत
असून जर कधी मोटार सायकल घसरुन अपघात झाला तर जबाबदार कोणाला धरणार. एखादा
नागरिक जर आजारी पडला तर त्याला डॉक्टरांकडे कसा न्यायचा ? अनेक स्त्रिया
गरोदर असताना डॉक्टरकडे जाण्यासाठी या मार्गावरून प्रवास करत असतात त्यांना
बालंतपणासाठी तालुक्याच्या ठिकाणी दवाखान्यात कसे न्यायचे किंवा रसत्यातच
त्या बाईवर काही वाईट प्रसंग ओढवला तर त्याला जबाबदार कोण ? असे अनेक
प्रश्न नागरिकांसमोर आ वासुन उभे आहेत. या भागातील जनता शांत व संयमी
असल्याचा गैर फायदा स्थानिक नेते मंडळीने घेऊन निवडणुका जवळ आल्या की
नागरिकांची दिशाभूल करण्याचे काम आजपर्यंत केले आहे. वाहतुकीची सोय असलेली
एकमेव एसटी बस सेवा बंद होऊ नये म्हणून कोकबल, ठाकरोली, सांगवड येथील
नागरिक दरवर्षी श्रमदान करून दगड माती टाकून तात्पुरते हे खड्डे भरतात. दहा
ते बारा वर्षापासून या रस्त्यावर एकदाही डांबर पडली नाही किंवा रस्त्यातील
खड्डे भरून रस्ता दुरुस्त करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेले
नाही. बांधकाम विभाग अधिकारी या भागात कधी फिरतच नाहीत त्यामुळे त्यांना
जनतेचे दुःख काय कळणार असा आरोप खड्डे भरताना उपस्थित या भागातील महिला व
ग्रामस्थ पोटतिडकिने करत आहेत. या भागातील ग्रामपंचयतींवर सत्ता असलेल्या
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या सरपंच व सदस्यांमधे
रस्त्याच्या दुरावस्ते बद्दल बोलण्याची धमक नसल्याने, स्थानिक नेते, तालुका
प्रमुख व कार्यकर्ते या भागातील रस्त्यांची दुरावस्था आपल्या वरिष्ठ
नेत्यांकडे खासदार, आमदार यांच्याकडे मांडून नागरिकांचे हाल कमी करतील का
असा सवाल या गावातील नागरिक करीत आहेत. कोणी रस्ता करून देता का रस्ता ....
अशी परिस्थिती या गावांवर ओढवली आहे. आगामी येणाऱ्या लोकसभा व विधानसभा
निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी
सांगितले. तसेच आगामी मार्च, एप्रिल मधे होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूकी
अगोदर कोणत्याही पक्षाने लेखी लिहून द्यावे की हा रस्ता कधी होणार व कोण
करणार आहे अन्यथा कोणत्याच पक्षाच्या प्रतिनिधीना गावात फिरून देणार नाही
तसेच ग्रामपंचायतीवर कोणत्याच पक्षाचा झेंडा लावून देणार नाही.
>
> एकंदरीत वस्तुस्थिती पाहिली तर हि गावे पक्षीय राजकारणात भरडली जात
आहेत. येथे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांचे समान
वर्चस्व असून ठाकरोली ग्रामपंचायत शिवसेनेकडे आहे. तर याभागातील काही लोक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आहेत. तीन वर्षापुर्वी
शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी सांगवड येथे रस्त्याच्या भूमी पूजनाचा नारळ
फोडला आणि प्रत्यक्षात रस्ता मात्र नेवरुळ पासून झाला आणि या लोकांच्या
प्रवासादरम्यान खिळखीळी होणाऱ्या हाडांचा त्रास थोडासा कमी करण्यासाठी
राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश्याध्यक्ष आमदार सुनिल तटकरे यांच्या
प्रयत्नाने गौण खनिज विकास निधीतून 37 लक्ष रुपयांचा खर्च करून नेवरुळ ते
घुम वनविभाग हद्द पर्यंतच डांबरिकरण रस्ता दुरुस्त करून त्रास कमी करण्यात
राष्ट्रवादीने बाजी मारल्याने उर्वरित अपुर्ण राहिलेला रस्ता पूर्ण
करण्यासाठी नागरिक आमदार सुनिल तटकरेंना साकडे घालून त्याची पूर्तता
होण्याची वाट बघत आहेत.
> > सध्याचे शिवसेना
नेते केंद्रीय मंत्री तथा रायगडचे खासदार अनंत गीते हे सहा वेळा खासदार
होऊन केंद्रात मंत्री झाले पण या भागातील ज्या लोकांनी त्यांना आपले
बहुमूल्य मत 'दान' केले त्या जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांच्याकडे
वेळ नसून या भागातील जनतेकडे त्यांनी अक्षरशः पाठ फिरवली असल्याचे
नागरिकांचे म्हणणे आहे. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती
किंवा स्थानिक स्वराज्य अशा निवडणुका जवळ आल्या कि या भागातील स्वताला
पुढारी म्हणवून घेणारे स्थानिक आणि मुंबईला राहणारे पदाधिकारी व
कार्यकर्ते गावागावात जाऊन आपापल्या पक्षाचा 'विकासनामा' जाहिर करून
ग्रामस्थांना बय, बावा, दादा, मामा, काका अशा आपुलकीच्या ग्रामीण बोलीभाषेत
गोड बोलून लोकांची दिशाभूल करीत मतांची विभागणी करताना या भागातील
विकासाला खो घालण्याचा दुर्दैवी प्रयत्न करत आहेत. शिवसेना - राष्ट्रवादी
या दोन पक्षांच्या 'राजकीय भांडणात' "खेळ होतोय मांजराचा आणि जीव जातोय
ऊंदराचा..." अशीच काहिशी स्थिती या भागातील जनतेची झाली आहे. शिवसेना व
राष्ट्रवादीच्या पक्षिय भांडणात सामान्य नागरिकांचे हाल करून स्वताची
राजकीय पोळी भाजुन घेणारे 'स्वयंम घोषित पुढारी' सामान्य जनतेच्या
प्रश्नांकडे कधी लक्ष देणार असा सवाल या गावातील नागरिक करत आहेत.
"कोकबल, ठाकरोली, सांगवड रस्त्यावर खुप मोठे खड्डे पडले असून प्रवास करताना मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवसेना पक्षाच्या वरिष्ठांना अनेक वेळा सांगूनही या रस्त्याचा प्रश्न सुटत नाही. निवडणूका आल्यावरच काही नेते गावात भेटायला येतात नंतर मात्र आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात आमच्या भागातील विदयार्थी, गरोदर महिला, वृद्ध व्यक्ती यांनी किती वर्षे असा त्रास सहन करायचा.श्रीमती ललिता सोनू येलवेसरपंच - ठाकरोली ग्रुपग्रामपंचायत
"कोकबल आणि या परिसरातील रस्त्यांचा झालेल्या दुरावस्थेला स्थानिक सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोन्हीही जबाबदार आहेत. पक्षाचे नेते निवडणूक काळात फक्त भाषण देऊन जनतेची दिशाभूल करतात आणि मते घेतात समस्या सोडवत नाहीत. खराब रस्त्यामुळे तालुका ठिकाणापासून गावात यायचे झाले तर खाजगी वाहने 500 ते 600 रुपये घेतात. आम्ही आज या ठिकाणी जे खड्डे भरतोय ते फक्त आमच्या मुलाबाळांचा, गरोदर महिला, अन्य वृद्ध व्यक्ती यांना प्रवास करताना त्रास होऊ नये आणि एसटी सेवा बंद होऊ नये म्हणून खड्डे भरतोय.श्री.पांडुरंग धोंडू मांडवकरउपसरपंच तथा अध्यक्ष, कोकबल ग्रामस्थ मंडळ
Post a Comment