तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची भाजप कडून मागणी गटविकास अधिकारी नीलम गाडे यांना दिले निवेदन

तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची भाजप कडून मागणी
गटविकास अधिकारी नीलम गाडे यांना दिले निवेदन
म्हसळा : प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यातील तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करीत म्हसळा तालुका भाजप तर्फे या योजनेची चौकशी करण्यासंदर्भात म्हसळा तालुक्याच्या गटविकासअधिकारी नीलम गाडे यांना निवेदन देण्यात आले. म्हसळा तालुक्यातील तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना हि १९९८ मध्ये सुरु झाली आणि या पंचक्रोशीतील ८ गावे व चार वाड्यांतील नागरिकांना या योजनेमुळे योग्य रित्या पाणी पुरवठा होत होता. त्यानंतर या योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी सप्टेंबर २००९ ते मार्च २०१६ पर्यंत रु. ५९,९१,९८९/- एवढा निधी सदर देखभाल दुरुस्तीसाठी गठीत पाणीपुरवठा समिती मार्फत खर्च करण्यात आला. एवढा मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करून देखील आजही हि योजना नादुरुस्त आहे. यामध्ये रेवली , गणेशनगर , बनोटी या तीन गावांना आजीबात पाणीपुरवठा होत नाही. या संदर्भात रेवली गाव अध्यक्ष व म्हसळा तालुका भाजप सरचिटणीस तुकाराम पाटील यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागविली असता यामध्ये धक्कादायक खुलासा समोर आला आहे असे पाटील यांनी सांगितले. सन २०११ – १२ मध्ये मुझफराबाद ते वरवटणे हायस्कूल पाईप लाईन टाकणे यासाठी रु २,४२,२१६/- एवढा निधी अशासकीय हायस्कूल साठी खर्च करण्यात आला. वरवटणे गावामध्ये जिजामाता शिक्षण संस्थेचे एकच हायस्कूल आहे आणि ते देखील विनाअनुदानित आहे. तसेच नळ जोडणी यादी मध्ये सदर हायस्कूल चे नाव देखील नाही. तरीही या हायस्कूल ला पाणी कुठून पुरविले जाते ? असा प्रश्न उपस्थित करीत हा जो रु २,४२,२१६ मुझफराद ते वरवटणे हायस्कूल या नळ जोडणीसाठी खर्च करण्यात आला आहे तो गैर प्रकाराने करण्यात आला आहे असा आरोप तुकाराम पाटील यांनी सदर पाणी समितीवर केला आहे. सदर नळ पाणीपुरवठा योजनेची १५ दिवसात सखोल चौकशी करावी अन्यथा महाराष्ट्र राज्य पाणी पुरवठा मंत्री महोदयांकडे तक्रार करू अशी तंबी म्हसळा भाजप ने गटविकास अधिकारी नीलम गाडे याना दिली. हे निवेदन देताना म्हसळा तालुका भाजप चे अध्यक्ष शैलेशकुमार पटेल , भाजप म्हसळा शहर अध्यक्ष मंगेश मुंडे, भालचंद्र करडे, अनिल टिंगरे हे उपस्थित होते.  

सदर तक्रार अर्जानुसार तोंडसुरे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची माहिती घेऊन सखोल चौकशी करण्यात येईल.
नीलम गाडे , गटविकास अधिकारी , म्हसळा

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा