५ नोव्हेंबर..जागतिक मराठी रंगभूमी दिन....

मराठी रंगभूमी खर्‍या अर्थाने इ.स.१८४३ मध्ये सांगली येथे उदयास आली. सांगली येथील संस्थानिक चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्या आश्रयामुळे कै. विष्णुदास भावे ह्यांनी दि ५ नोव्हे.१८४३ साली सांगली येथे " सीता स्वयंवर " ह्या नाटकाचा प्रयोग केला आणि मराठी रंगभूमीचा पाया रचिला.. मराठीतील हे पहिले गद्य पद्यमिश्रित नाटक जन्मास आले.

नृत्य, गायन, अभिनय, देव, गंधर्व, अप्सरा, ऋषी, विदूषक इ.नी युक्त अशी ही पौराणिक नाटके सर्वसामान्यांची करमणूक करू लागली. मराठी संगीत नाटकांनी तर मराठी माणसाच्या हृदयात कायमचे स्थान निर्माण केले..
साधारणपणे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावधीस सुरु झालेली मराठी नाट्यपरंपरा तेव्हापेक्षा कितीतरी पटीने अधिक जोशात जोपासली जात आहे. दररोज नवनवीन नाटके रंगभूमीवर येत आहेत, यापुढेही येत राहतील. आजपर्यंत अनेक नाटके मराठी रंगभूमीवर आली. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, निव्वळ करमणूकप्रधान, रहस्यमय असे वेगवेगळे विषय आणि प्रकार मराठी रंगभूमीने हाताळले.
१७० वर्षाची ही रंगभूमीची परंपरा..आजही २१ व्या शतकातल्या गतिमान युगात, जोपासली जात आहे. ह्या १७० वर्षातील सर्व ज्ञात, अज्ञात कलावंत, तंत्रज्ञ आणि सहायक ज्यांनी ही परंपरा अखंड चालू ठेवली आणि  मराठी रसिकांच्या मनात रुजवली त्या सर्वांचं अभिनंदन !🎭

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा