ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराची शनिवारी गावोगावी धुमधडाक्यात सांगता...

गावचे कारभारी ठरवणार्‍या ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराची शनिवारी गावोगावी धुमधडाक्यात सांगता झाली. प्रचार संपल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून उडालेला आरोप-प्रत्यारोपांचा धुरळाही खाली बसला आणि गुलाल आपल्यावरच कसा पडेल, यासाठीची यंत्रणा वेगाने कामाला लागली. पदयात्रेच्या माध्यमातून उमेदवारांनी शेवटच्या दिवशी प्रभागातला कोपरा अन् कोपरा पिंजून काढला. मतदानापर्यंतचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे असल्याने मतदारराजाची बडदास्त ठेवण्यासाठी  खास यंत्रणा उमेदवारांकडून तैनात करण्यात आली आहे. दिवाळीपूर्वीच ‘लक्ष्मी दर्शन’ घडवण्यासाठी यंत्रणाही कामाला लागली आहे.

सोमवारी (दि. 16) जिल्ह्यातील 472 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. आचारसंहितेमुळे मतदानापूर्वी 48 तास जाहीर प्रचार करता येत नाही. त्यामुळे शनिवार हा जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस होता. गेल्या पंधरा दिवसांपासून गृहभेट आणि पदफेरीच्या माध्यमातून उमेदवारांनी मतदारापर्यंत जाऊन आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्थानिक प्रश्‍नावर, स्थानिक पातळीवर लढवल्या जात असल्याने यात जिल्ह्यातील बड्या राजकीय नेत्यांचा फारसा हस्तक्षेप असत नाही; पण यंदा सरपंच निवड थेट जनतेतून केली जाणार असल्याने गावची सत्ता आपल्याच पक्षाकडे राखण्यासाठी बडी नेते मंडळी आग्रही आहेत. कार्यकर्त्यांना त्यांनी रसद पुरवली असून अधिकाधिक गावात आपल्याच पक्षाचा, गटाचा सरपंच कसा होईल, यासाठी जोरदार ‘फिल्डिंग’ लावली आहे.

गावात ग्रामपंचायत सदस्य निवडीपेक्षा सरपंच निवडीला अधिक महत्त्व आले असून त्याची झलक प्रचारादरम्यान दिसली आहे. ‘मनी पॉवर’ हीच प्रभावी ठरत असल्याने ती वापरण्यासाठी उमेदवारांनी जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी खास विश्‍वासातली टीम उमेदवारांकडून तयार करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीसाठी एकेक मत महत्त्वाचे असल्याने एकही मत बाहेर जाऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. मतदारांची व्यक्तिगत भेट घेऊन त्यांना शब्द देऊन त्यांचाही ‘शब्द’ घेतला जात आहे.

पारंपरिक प्रचाराला ‘सोशल टच’

यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत पोस्टर, हळदी-कुंकू, शिवार फेरी, पदफेरी या पारंपरिक प्रचाराबरोबरच ‘सोशल मीडिया’चाही अधिक वापर झाला. व्हॉटस् अ‍ॅपसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदार कनेक्टिव्हिटी वाढवण्याचा जोरदार प्रयत्न झाला. एकमेकांची उणीदुणी सोशल मीडियाच्या माध्यमातूनच काढली गेली.

धाबे, हॉटेल हाऊसफुल्ल!

मतदार हा मतदान होईपर्यंत राजाच असल्याने त्याची कृपादृष्टी आपल्यावरच रहावी म्हणून सर्वच उमेदवारांनी या राजाच्या पोटपूजेपासून ते अन्य हौस पुरविण्यावर अधिक भर दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा