सामाजिक अर्थसहाय्य योजनाः निराधार, गरिबांसाठी जगण्याचे बळ...

स्वावलंब हा स्वाभिमानाचा मंत्र आहे. समाजातील निराधार, अपंग, वयोवृद्ध  गरिबांना जगण्यासाठी कुणासमोर हात पसरण्याची आवश्यकता भासू नये तसेच त्यांचे आयुष्य हे स्वावलंबी असावे यासाठी शासनामार्फत सामाजिक अर्थसहाय्य योजना  योजना राबविण्यात येतात.
या योजना राबवून अधिकाधिक गरजूंपर्यंत लाभ पोहोचविण्यात रायगड जिल्हा प्रशासनाने चांगली कामगिरी बजावली आहे. एकीकडे सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ 27 हजार 717 लाभार्थ्यांना दिला जात आहे. तर  तर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन विमा योजना, अटल पेन्शन योजना  या योजनांमधुन  4 लाख 17 हजार 660 लोकांना सामाजिक विमा व पेन्शन योजनेत सामावून घेतले आहे. 
 राज्य आणि केंद्र शासनाच्या विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत या योजना राबविण्यात येतात.  त्यात मुख्यतः  इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना  या प्रमुख सहा योजना राबविल्या जातात. यात बहुतांश निराधार, विधवा,  अपंग, वृद्ध अशा समाजघटकांना समाविष्ट करुन लाभ दिला जातो. त्याच सोबत  प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना या योजनांमधून समाजातील गोरगरीब आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना  विमा संरक्षणाचा लाभ व पेन्शन योजनेचा लाभ दिला  जातो.
 रायगड जिल्हाप्रशासनाने आपल्या जिल्ह्यातील यंत्रणेमार्फत  इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेंतर्गत 8 हजार 711 लाभार्थ्यांना 1 कोटी 12 लाख 32 हजार 800 रुपयांचे निवृत्तीवेतन अदा केले आहे. तर इंदइरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेंतर्गत 1157 लाभार्थ्यांना 14 लाख 63 हजार 400 रुपयांचे निवृत्तीवेतन अदा केले आहे. तर इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेत  201 लाभार्थ्यांना 2 लाख 80 हजार 200 रुपयांचे पेन्शन देण्यात आले आहे. राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेत 86 लाभार्थ्यांना 17 लक्ष 20 हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत 12 हजार 298 लाभार्थ्यांना 5 कोटी 12 लक्ष 13 हजार 950 रुपये अनुदान वितरीत झाले आहे.  श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेद्वारे 5 हजार 264 लाभार्थ्यांना 4 कोटी 22 लक्ष 98 हजार 600  रुपयांचे निवृत्तीवेतन देण्यात आले आहेत. हे सप्टेंबर महिन्याअखेरचे आकडे आहेत. दरमहा हा लाभ लाभार्थ्यांच्या थेट खात्यात जमा केला जातो.  
 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या केंद्रीय योजनांमधून  विमा व पेन्शन योजनांचा लाभ जिल्ह्यातील लोकांपर्यंत पोहोचविण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी झाले आहे. त्यात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत 3 लाख 4 हजार 254 लोकांनी सहभाग घेतला आहे. तसेच प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेत 1 लाख 3 हजार 78 लोकांना विमासंरक्षण प्राप्त झाले आहे. तर 10 हजार 328 लोकांना अटलपेन्शन योजनेत सहभाग नोंदविला आहे.  अशा एकूण चार लाख 17 हजार 660 लोकांना जिल्हाप्रशासनाने विमा संरक्षण व पेन्शन योजनेत सहभागी केले आहे. या शिवाय प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत  2 लाख 91 हजार 72 लोकांनी शून्य  रकमेवर खाती उघडून बॅंक व्यवस्थेशी स्वतःला जोडले आहे. ही आकडेवारी 10 ऑक्टोबर पर्यंतची आहे.

दर महिन्याला या योजनांत पात्र लाभार्थी सहभागी होत असतात.  जिल्हा प्रशासकिय यंत्रणा अधिकाधिक लोकांपर्यंत या योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
- डॉ. मिलिंद दुसाने, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी, रायगड, अलिबाग.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा