फिरत्या ग्रामसेवकांवर श्रीवर्धन तालुक्याचा कारभार


पूर्णवेळ ग्रामसेवक नसलेल्या ग्रामपंचायतींच्या कामावर होतोय परिणाम

बोर्लीपंचतन : ( गणेश प्रभाळे ) – श्रीवर्धन तालुक्यातील प्रमुख ग्रामपंचायत मध्ये समावेश होणाऱ्या बोर्लीपंचतन शहरानजीक असलेल्या दिघी ग्रामपंचायतीला वारंवार ग्रामसेवक उपलब्ध होत नसल्यामुळे गावाच्या विकासावर परिणाम होत असल्याचे दिघी ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. ग्रामपंचायतीचा कारभार ज्याच्या हातात असतो त्या ग्रामसेवकांची संख्या श्रीवर्धन तालुक्यात 21 आहे. आणि ग्रामपंचायतींची संख्या 43 आहे.यामध्ये 78 ग्रुप ग्रामपंचायती, त्यात येणाऱ्या वाड्या, वस्त्या व गावांची संख्या वेगळीच. त्यामुळे तालुक्यातील काही ग्रामपंचायतींचा कारभार फिरत्या ग्रामसेवकांवर सुरू आहे. त्याचा परिणाम पूर्णवेळ ग्रामसेवक नसलेल्या ग्रामपंचायतींच्या कामावर होत आहे.

पंचायत राज व्यवस्थेत सर्वात शेवटचा घटक म्हणजे ग्रामपंचायत. त्यामुळे या व्यवस्थेत ग्रामपंचायतींना अधिक महत्त्व आहे. शासनाच्या योजना थेट गावापर्यंत किंवा लाभार्थ्यांपर्यंत पोचविण्याचे काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केले जाते.

श्रीवर्धन तालुक्याच्या दिघी पोर्ट मुळे चर्चेत आलेल्या दिघी ग्रामपंचायतीचा कारभार अद्यापर्यंत चार ग्रामसेवकांकडे येऊन गेला मात्र वर्षे भर तात्पुरत्या कारभारामुळे येथील विकासाला खीळ बसली आहे. ग्रामसेवक नसल्याने गावाचा विकास खुंटला असून,विद्यार्थी व नागरिकांची विविध दाखल्यांसाठी अडचण निर्माण झाल्याचे चित्र आहे. गेल्या वर्ष पासून नियमितपणे ग्रामसेवक येत नसल्याने ग्रामस्थ, विद्यार्थी ग्रामपंचायत कार्यालयात विविध दाखले व उताऱ्यासाठी हेलपाटे मारत आहेत. शासकीय योजना गावात यशस्वीपणे राबवलया जात नाही. या शिवाय माहिती अधिकार अर्ज व शासकीय पत्रव्यवहाराची प्रकरणे प्रलंबित आहेत. दिघी ग्रामपंचायत अंतर्गत दिघी, नानवेली, सावरर्डे, मनेरी व करलास या गावांचा समावेश होतो. शालोपयोगी तसेच इतर दाखले मिळवण्यासाठी ग्रामास्थांची नेहमी दिघी ग्रामपंचायत कार्यालयात वर्दळ असते. ठरलेल्या दोन दिवशी ग्रामसेवकच नियमित येत नसल्याने ग्रामस्थ संतप्त झालेत.

या संदर्भात सर्व सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने दिघी सरपंच यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी मागणी केली आहे. परंतु प्रशासनाकडून कोणतीही भूमिका घेण्यात आलेली नाही. दिघी पोर्ट कंपनी या गावालाच खेटून असल्याने अनेक वाहनांची वर्दळ व दळणवळणासाठी होणारी गर्दी यामुळे सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. परिणामी ग्रामसेवक नसल्याने ग्रामपंचायत कडून नियोजन होत नाही. दरम्यान वेळोवेळी तक्रार करूनही पंचायत समितीकडून दुर्लक्ष होत असल्याचे सरपंच यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

श्रीवर्धन तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक उपस्थित नसतात अगोदरच गावे जास्त ग्रामसेवक कमी अशी अवस्था तालुक्याची आहे. असे असले तरी दिलेल्या गावामध्ये ग्रामसेवक राहत नसल्याचे चित्र आहे. तालुक्याला मिटींग आहे, किंवा इतर कारणे देवून काही ग्रामसेवक पंचायत समितीच्या अवतीभोवती फिरतांना दिसून येतात. मात्र गावात विविध दाखले व इतर कामांसाठी ग्रामस्थांना वणवण करावी लागते. यासाठी विस्तार अधिकारी यांनी आठवड्याचा एक तक्ता तयार करून तक्त्यामध्ये ग्रामसेवक, शाखा अभियंता व कर्मचारी हे कोणत्या कामासाठी कुठे गेले, किती दिवस गेले व कशासाठी गेले याची नोंद करून त्या कामांची पाहणी स्वत: गटविकास अधिकारी यांनी करावी व गटविकास अधिकारी यांनी आठवड्याच्या मिटींगमध्ये त्याचा लेखाजोखा मागावा, अशी मागणी येथील नागरिक करु लागलेत.

गटविकास अधिकारीच प्रतिनियुक्तीवर : श्रीवर्धन च्या गटविकास अधिकारी विद्या गमरे गेल्या कित्येक महिन्या पासून रजेवर आहेत त्यांचा काम विस्ताराधिकारी सी एच गमरे पाहतात. ग्रामसेवक मागणीसाठी जिल्हा परिषद कडे पत्रव्यवहार सुरू असल्याचे सांगितले.

दिघी ग्रामपंचायत साठी गेली वर्षभरापासून एकही पूर्णवेळ ग्रामसेवक दिला गेला नाही. तात्पुरता चार्ज देऊन काम केले जाते. मोठी ग्रामपंचायत असल्याने पूर्णवेळ अधिकारी द्यावा.

- सुमती चिकाटी, सरपंच - दिघी.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा