पोलादपूर शाळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळांना दिली खबरदारी म्हणून परिसरातील झाडांची छाटणी करण्याचे आदेश
शाळा अनुदान मात्र माफक, शाळांचे वीज बिल भरण्याचे वांदे, झाडांची छाटणी करणार कशी?
जी.प. शाळांपुढे प्रश्न
म्हसळा : सुशील यादव
पोलादपूर तालुक्यातील कापडे गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारातील झाड पटांगणात कोसळून दोन विद्यार्थी जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी(माध्यमिक) सुनील सावंत यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व शाळांना त्या-त्या तालुक्यातील गट शिक्षण अधिकाऱ्यांंमार्फत पत्र देऊन खबरदारी घेण्याचा आदेश दिला आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या रायगड जिल्ह्यातील अनेक शाळांच्या इमारती अनेक वर्षे जुन्या आहेत. प्रत्येक शाळेच्या आवारात मोठी मोठी झाडे आहेत. या झाडांची वेळेवर छाटणी न झाल्यामुळे व रायगड जिल्ह्यात होणारा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाउस पाहता जिल्ह्यातील सर्वच शाळांच्या मुख्याध्यापकाना आपापल्या शाळेच्या आवारातील धोकादायक झाडांची छाटणी/तोडण्याचची शिक्षण अधिकाऱ्यांकडून सुचना करण्यात आली आहे. जेणेकरून पोलादपूर तालुक्यातील कापडे येथील शाळेच्या दुर्घटने सारखी किंवा त्याही पेक्षा गंभीर दुर्घटना होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून सदर सुचना जिल्ह्यातील शाळांना करण्यात आली आहे. परंतु रायगड जिल्हा परिषदेच्या शाळाना शाळा अनुदान एका वर्षा साठी फक्त रु ५ ते १५ हजारापर्यंतच जिल्हा परिषदे मार्फत दिले जाते. यामध्ये शाळा दुरुस्ती, परिसर स्वच्छता, वीज बिल भरणे, वर्ष भरासाठी शाळेला लागणारी स्टेशनरी, सांस्कृतिक कार्यक्रम यासोबतच अनेक छोटी मोठी लागणारी कामे करावयाची असतात. रा.जी.प. शाळेच्या शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक शाळेच्या मुख्याध्यापकांना हे अनुदान वर्ष भराच्या शाळेच्या वीज बिल भरण्यातच संपून जाते. कारण महावितरण ने सर्वच जिल्हा परिषदेच्या शाळांना कमर्शियल मीटर दिल्याने वीज बिल सुद्धा मोठ्या प्रमाणात येते. तसेच काही शाळांना दुरुस्तीचा खर्च सुद्धा रु. १० ते १५ हजाराच्या वर होतो. स्टेशनरी चा शाळा सुरु झाल्यावर खर्च रु ५ ते ६ हजारापर्यंत होतो तर वर्षभरात रु १० हजारापर्यंत किवा त्याही पेक्षा जास्त होतो. सांस्कृतिक कार्यक्रम , विविध शालेय उपक्रम , यामध्ये आजकाल भरमसाट खर्च रा.जी.प. शाळाना होतच असतो. त्यातच शाळामध्ये होणारे विविध कार्यक्रम व या कार्यक्रमासाठी येणारे पाहुणे मंडळी यांचा पाहुणचार असे विविध प्रकारचे खर्च रा.जी.प. शाळेतील शिक्षकांना करावे लागतात. मग काय त्या-त्या शाळेतील शिक्षक आपल्या खिशाला कात्री लाऊन व स्थानिक शालेय व्यवस्थापन समिती ची मदत घेऊन हा खर्च भागवत असतो.पोलादपूर तालुक्यातील दुर्घटनेनंतर विद्यार्थी सुरक्षतेकरीता जिल्हा शिक्षणअधिकाऱ्यांनी दिलेला शाळा आवारातील झाडे छाटणीचा हा आदेश स्तुत्यच आहे परंतु जिल्ह्यातील रा.जी.प. शाळांचे मुख्याध्यापक वर्ष भरात या माफक शाळा अनुदानातून वर्षभराचा शाळेचा खर्च कसा भागवितात याची कधी साधी विचारणा या शिक्षण अधिकाऱ्यांनी केली आहे का ? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. रा.जी.प. शाळांच्या मुख्याद्यापाकानी/शिक्षकांनी काहीही करा पण अधिकाऱ्यांचे आदेश मात्र पाळा हि शिक्षण व्यवस्था आहे की अवस्था हे त्यांचे त्यांनाच ठाऊक.
रायगड जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार म्हसळा तालुक्यातील सर्व प्राथमिक , माध्यमिक शाळांच्या मुख्याद्यापकाना पत्र काढून शाळेच्या आवारातील धोकादायक झाडांची छाटणी करण्यासंदर्भातील सुचना केल्या आहेत. मी स्वतः तालुक्यातील अनेक शाळांची प्रत्यक्ष पाहणी केली आहे व त्यानुसार मुख्याद्यापकाना खबरदारीच्या सुचना केल्या आहेत.
गजानन साळुंखे , गट शिक्षण अधिकारी, म्हसळा
शाळांना येणारे शाळा अनुदान हे फारच कमी आहे. आम्हाला शाळा दुरुस्ती ,स्वच्छता ,वीज बिल , वर्ष भराचे उपक्रम करताना मिळालेल्या शाळा अनुदानाच्या दुप्पट ते तिप्पट खर्च होतो. शाळा अनुदाना व्यतिरिक्त खर्च आम्ही शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षक मिळून करतो. परंतु जिल्ह्यातील सर्वच शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य आर्थिक सक्षम असतीलच असे नाही. तेव्हा रा.जी.प. ने शाळा अनुदानात वाढ करावी.
पूजा प्रसाद करंबे , उपाध्यक्षा शालेय व्यवस्थापन समिती रा,जी.प. शाळा म्हसळा न.१
Post a Comment