म्हसळा :
नवानगर येथील तरूणांनी नालेसफाईसाठी घेतला पुढाकार , नगरपंचायतच्या ३३ लाखाच्या नालेसफाई कंत्राटाचा फज्जा , सर्वच नगरसेवक मुग गिळून गप्प...
म्हसळा : सुशील यादव
म्हसळा शहराच्या दिधी रस्त्यावर पहील्या पावसातच तुंबलेल्या गटारांमुळे नवा नगर कडे जाणारा रस्ता व मुख्य दिघी रस्त्यावर गेले आठ ते दहा दिवस पाणी साचले होते. याबाबत नगरपंचायत कडे अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या परंतू गेंडयाच्या कातडीचे नगरपंचायत प्रशासन नालेसफाईचे ३३ लाखाचे कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराकडे बोट दाखवून मुग गिळून गप्प बसले . शेवटी नवानगर , म्हसळा येथील काही तरूणांनी स्वतः पुढाकार घेत अंगमेहनत करून दिघी रस्त्यावरील तुंबलेली गटारे साफ केली त्यामुळे तुंबलेल्या पाण्याचा योग्य निचरा होऊन रस्त्यावरील पाणी ओसरले . ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये होऊन जवळ जवळ दीड वर्ष होत आलीत. विकासाच्या नावावर मते मागून निवडून आलेल्या नगरसेवकांना मात्र नागरिकांना दिलेल्या वचनांचा विसर पडलेला दिसतो आहे . आणि याची प्रचिती अशा कामांतून वारंवार मिळत आहे . गेल्या वर्षी ६ जून २०१६ नगरपंचायत कडून नालेसफाईचे ३३ लाखाचे कंत्राट 'बी .एम्. कन्स्ट्रक्शन ' नावाच्या कंपनीला देण्यात आले होते. मागील वर्षी संपूर्ण वर्षाच्या शहरातील नालेसफाईसाठी म्हसळा नगरपंचायतच्या नगरसेवकांनी अपेक्षीत ३८ लाख रूपये खर्च मंजूरी साठी ठराव केला होता त्यापैकी प्रशासनाकडुन रू ३५ लाखांची मंजूरी मिळाली होती व हे कंत्राट बी .एम. कन्स्ट्रक्शन या कंपनीने इ टेंडरींग पद्धतीने रु .३३ लाखाला मिळविले होते . परंतू वर्षभरात या कंपनीकडून अंदाजे फक्त रु १८ लाखाचेच नालेसफाईचे काम झाले . आणि कंत्राट संपेपर्यंत पून्हा पावसाळा आला व गटारे जशीच्या तशी तुंबलेली .
आता हे नालेसफाईचे नवीन कंत्राट निघेपर्यंत ही नालेसफाई करायची कोणी ? हा प्रश्न नगरपंचायत प्रशासनाला पडला खरा परंतू लगेच याचे उत्तर शोधण्यात आले व संबधीत कंत्राटदारालाच महीनाभराची मुदत वाढवून देण्यात आली परंतू या कंत्राटदाराने चालढकल करीत काही प्रमाणात नालेसफाई करतोय असे दाखवत पंधरा दिवस ढकलले . आणि आच्छर्य म्हणजे एकही सत्तेतील अथवा विरोधी पक्षातील नगरसेवक या बाबतीत 'ब्र ' काढायला तयार नाही . याचा अर्थ नागरिकांनी काय घ्यायचा ? एक तर हा कंत्राटदार या नगरसेवकांचा नातेवाईक तर असेल नाही तर नाव बी .एम. कन्स्ट्रक्शन काम मात्र नगरसेवकांचे असे असेल . एकंदरीत काय ? यामध्ये म्हसळा शहरातील जनता मात्र भरडली जातेय . सध्या मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महीना चालू आहे त्यातच या मुस्लीम बांधवांना गटाराच्या अपवित्र सांडपाण्यातून नमाज अदा करणेसाठी जावे लागत आहे याची साधी जाणीव या नगरसेवकांना न व्हावी , याला म्हसळा वासियांचे दुर्देवच म्हणावे लागेल आणखी काय ? बरं ! मागील वर्षाच्या नालेसफाईसाठीच्या रू . ३३ लाखांपैकी फक्त रू .१८ लाखाचेच काम झाले असेल तर पून्हा वर्षभराच्या नालेसफाईसाठी रू .३५ लाखाच्या कंत्राटाची निविदा कशाला ? नगरपंचायत ने ३५ काय ५० संपवावेत हो , परंतू नालेसफाई होतेय कुठे ? याचे उत्तर 'नगरपंचायतने केलेल्या विकासामुळे तुंबलेल्या गटाराने त्रस्त ' शहरवासीय मागत आहेत .आणि शेवटी नगरपंचायतच्या कारभाराला कंटाळून नवा नगर म्हसळा येथील शेहबाज पठान , सुहेल हवालदार , मुजीब साने , माजीद काझी , अबूशमा हळदे , अकलाख हवालदार , मुफीक कौचाली , कैफ दोंदीलकर, समिर फिरफिरे या तरुणांनी स्वतः पुढाकार घेत दिघी रस्त्यावरील तुंबलेली गटारे स्वत : अंगमेहनतीने साफ करून स्वच्छतेच्या बाबतीतील एक सणसणीत चपराकच नगरपंचायत ला लगावली आहे .
छाया : सुशील यादव
नालेसफाईचा मागील वर्षीचा ठेका संपलेला आहे व नवीन ठेका देण्याची प्रक्रिया सुरू आहे . तुर्तास जुन्या ठेकेदारालाच एक महीन्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे .तसेच या ठेकेदाराला कामात दिरंगाई झाल्यास बिलातून रक्कम कपात केली जाईल असे बजावले आहे . नवा नगर येथील या तरूणांनी केलेले नालेसफाईचे हे काम नक्कीच कौतुकास्पद आहे .
वैभव गारवे , मुख्याधीकारी , नगरपंचायत म्हसळा
Post a Comment