क्षमतेपेक्षा जास्त वाहतुक करणार्या वाहनांवर कारवाई केली जाणारः लक्ष्मण दराडे
संघर्षने हाती घेतला ओव्हरलोड वाहतुकीचा मुद्दा
पनवेलः
क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतुक करणार्या अवजड वाहनांना निर्बंध घालून त्यांच्यावर निश्चितच दंडात्मक कारवाई आणि कायद्याची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांनी दिले.
पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दराडे यांची आज, सोमवारी (दि. 19) भेट घेवून खारघर ते दिघी पोर्टपर्यंत चालणार्या अवजड वाहनांसह अपघातांना कारणीभूत ठरणार्या अवजड वाहनांच्या मालवाहतुकीसंदर्भांत सविस्तर चर्चा केली.
जेएनपीटी औद्योगिक परिसरात गेल्या दोन वर्षात बाराशेपेक्षा जास्त व्यक्ती मृत्यूमुुखी पडल्या आहेत. त्यानंतर उसळलेल्या उद्रेकातून सामाजिक प्रश्न ऐरणीवर आले आहेत. याला कारणीभूत ठरणार्या अवजड आणि कायद्याचे बंधन झुगारून क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतुक करणार्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात नाही. त्यामुळे चालक निर्ढावले आहेत. मालकांनाही कायद्याचे भय नसल्याचा मुद्दा शिष्टमंडळाने उपस्थित केला होता.
प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांनी निवेदनातील मुद्द्यांना स्पर्श करताना, कारवाई सुरू असते. फेब्रुवारी ते मार्चमध्ये कारवाईचा सप्ताह सुरू असतो अशी माहिती दिली. तेव्हा शासकीय चौकटीनुसार कारवाईचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कारवाई न करता बड्या वाहतुकदारांवर ओव्हरलोडची दंडात्मक कारवाई कठोरपणे करावी, असा मुद्दा पराग बालड यांनी मांडला. त्यावर उत्तर देताना दराडे यांनी सदर मुद्द्यांशी तत्वतः सहमत असल्याचे सांगून येत्या आठवडाभरात कारवाई करून कायद्याची शिस्त लावली जाईल, असे सांगितले.
पनवेल शहरासह आजुबाजूच्या परिसरात रिक्षा चालकांची मुजोरी वाढली असल्याची तक्रार यावेळी माधुरी गोसावी यांनी केली. त्यांनाही शिस्त लावण्याची गरज असल्याचे सांगताच, दराडे यांनी कारवाईचा तक्ताच समोर ठेवला. 15 वर्षापेक्षा जास्त कालावधीची मर्यादा ओलांडणार्या रिक्षा चालकांवर कारवाई केली जाते. अन्य काही तक्रारी असल्याचे निराकरण करू असे दराडे यांनी सांगितले.
अप्रशिक्षित चालकांमुळे इतर वाहनांतून प्रवास करताना धोकादायक वाटत असल्याची भीती दमयंती म्हात्रे यांनी व्यक्त केली. तर त्यांचे समुपदेशन करण्याची गरज आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज असल्याचे मत विजय काळे यांनी व्यक्त केले.
येत्या महिनाभरात वाहतुकदार, चालक, मालक, क्लिनर यांचे समुपदेशन आणि कायदाचे धडे देण्यासाठी प्रशिक्षण शिबिर घेतले जाईल, असे आश्वासन दराडे यांनी शिष्टमंडळाला दिले.
याप्रसंगी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज औसारी, श्री माने, मोटार निरीक्षक हरिभाऊ जेजुरकर, तर शिष्टमंडळात कांतीलाल कडू, विजय काळे, माधुरी गोसावी, पराग बालड, दमयंती म्हात्रे, उज्वल पाटील, कविता ठाकूर, ऍड. संतोष सरगर आदींनी चर्चेत सहभाग घेतला होता.
Post a Comment