अलिबाग, शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाच्यावतीने युवक-युवतींच्या शारिरीक सुदृढता विकास व क्रीडा कौशल्य विकासासाठी व्यायामशाळा व क्रीडांगण विकासासाठी अनुदान योजना राबविण्यात येत असून जिल्ह्यातील इच्छुक संस्था,स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
व्यायामशाळा विकास योजनेअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद, आदिवासी विकास व सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा व वसतिगृह, पोलीस कल्याण निधी, पोलीस विभाग,स्पोर्टस क्लब, ऑफिसर्स क्लब,खाजगी शैक्षणिक संस्थेद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालये ज्यांना शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे,अशा निकष पूर्ण करणाऱ्या संस्थांना सात लाख रुपयांचा निधी वितरीत केला जातो. तसेच क्रीडांगण विकास योजनेंतर्गत क्रीडांगण विकासासाठी जास्तीत जास्त सात लाख रुपयांपर्यंत व क्रीडा साहित्य खरेदी करीता जास्तीत जास्त तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते. या योजनांचा लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज व अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली संगम, पो.वेश्वी, ता.अलिबाग येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, महादेव कसगावडे यांनी केले आहे.
Post a Comment