म्हसळा प्रतिनिधी
बारामती येथे २६ ते ३१ जानेवारी दरम्यान आयोजित ६९ वी राष्ट्रीय कराटे स्पर्धेत म्हसळ्याचे सोहेल शशिकांत तांबे आणि विक्रांत विश्वास खांडेकर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
शाळा गेम्स ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून आयोजित या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, गोवा, पंजाब, आंध्रप्रदेश, राजस्थान, बिहार, तामिळनाडू, केरळ, ओडिशा आणि दिल्लीसह विविध राज्यांतील खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल म्हसळाचा सोहेल तांबे (वजनी गट ६६) यांनी सुवर्ण पदक जिंकले, तर न्यू इंग्लिश स्कूल म्हसळाचा विक्रांत खांडेकर (वजनी गट ५०) यांनी रौप्य पदक मिळवले.
सोहेल तांबे हा म्हसळा तालुक्यातील राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्यांच्या या यशाबद्दल स्थानिक तसेच राज्यस्तरीय स्तरावर कौतुक व्यक्त केले जात आहे.
त्यांच्या या यशामागे शिहान संतोष मोहिते व प्रशिक्षक सेन्सई अविनाश मोरे यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. तसेच, महाराष्ट्र कराटे असोसिएशनचे अध्यक्ष सलाउद्दीन अन्सारी, जनरल सेक्रेटरी संदीप गाडे आणि अभय कळमकर यांचेही सहकार्य लाभले.
Post a Comment