म्हसळा - सुशील यादव
म्हसळा तालुक्यातील खारगाव खुर्द येथील सकलप परिसरात शेतकरी चंद्रकांत पांडुरंग कांबळे यांच्या मालकीचा बैल अज्ञात व्यक्तींनी चोरल्याची घटना घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.या प्रकरणी त्यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार चंद्रकांत कांबळे यांनी आपला बैल नेहमीप्रमाणे जंगल परिसरात चरण्यासाठी सोडला होता.मात्र सायंकाळी तो गोठ्यात दावणीला परत न आल्याने शोधाशोध सुरू करण्यात आली.सात दिवस उलटून गेले तरी बैल सापडला नसल्याने तो कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी चोरून नेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.विशेष म्हणजे चंद्रकांत कांबळे यांच्या मालकीची गुरे चोरीला जाण्याची ही मागील काही कालावधीतील सातवी घटना असल्याचे त्यांनी सांगितले.यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून त्यांच्यावर मानसिक तणावही वाढत आहे.म्हसळा तालुक्यात अधूनमधून शेतकऱ्यांचे गोठे व चरण्यासाठी गेलेले गो-धन चोरीला जात असल्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, म्हसळा नगरपंचायतीच्या वतीने शहर परिसरात मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्यात आले आहे.या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून म्हसळा पोलिसांनी सखोल तपास करून चोरट्यांचा शोध घ्यावा अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.या प्रकरणाचा पुढील तपास म्हसळा पोलीस करत असून गो-धन चोरीच्या वाढत्या घटनांवर तातडीने आळा घालावा अशी अपेक्षा शेतकरी वर्ग व्यक्त करत आहे.
Post a Comment