म्हसळा : सुशील यादव
रायगड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या 'साहेब' विरुद्ध 'शेठ' असा जोरदार संघर्ष पाहायला मिळत असून, म्हसळा नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांना जबरदस्त 'धोबीपछाड' दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून पक्षादेशाचे उल्लंघन करणाऱ्या म्हसळ्यातील ७ नगरसेवकांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अपात्र घोषित केले आहे. या धडक निर्णयामुळे शिंदे गटाला जिल्ह्यात मोठा राजकीय फटका बसला आहे.
काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीच्या ७ नगरसेवकांनी पक्षांतर करत शिंदे गटाची वाट धरली होती. या पक्षांतरामुळे म्हसळ्यातील राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का लागला होता. मात्र, सुनील तटकरे यांनी कायदेशीर लढाई लढत या नगरसेवकांविरुद्ध माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी चे गटनेते संजय कर्णिक यांच्या तर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे अपात्रतेचा अर्ज दाखल केला होता. या सुनावणीत अखेर तटकरेंच्या रणनीतीचा विजय झाला असून, मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचे बळ घटले आहे.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी 'महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६' मधील कलम ३(२) आणि १९८७ च्या नियम ८(१) मधील तरतुदींनुसार हा निकाल दिला. पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्याने या सर्व सातही सदस्यांचे पद रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अपात्र ठरलेले ७ 'माजी' नगरसेवक:
१. श्रीम. कमल रवींद्र जाधव
२. श्रीम. मेहजबिन नदीम दळवी
३. श्री. असलह असलम कादिरी
४. श्रीम. फरहीन अ. अजीज बशारद
५. श्रीम. सुमैया कासम आमदानी
६. श्रीम. सारा अ. कादीर म्हसलाई
७. श्री. शाहिद सईद जंजिरकर
अलिबाग येथे २७ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या या निर्णयामुळे म्हसळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची पकड पुन्हा घट्ट झाली आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तोंडावर हा निकाल आल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दुसरीकडे, भरत गोगावले यांचा हा मोठा मानहानीकारक पराभव मानला जात असून, आगामी काळात तालुक्याची राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत.
Post a Comment