दक्षिण रायगडमध्ये निवडणुकीचा शंखनादमहायुतीत जागावाटपाचा तिढा, छोट्या पक्षांसमोर अस्तित्वाचे आव्हान

म्हसळा । जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या घोषणेनंतर दक्षिण रायगडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पेण, महाड आणि श्रीवर्धन या मतदारसंघांत महायुतीतील घटक पक्षांमध्ये सत्तासंघर्ष तीव्र झाला असून ग्रामीण भागावर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमनेसामने उभे ठाकले आहेत.

महायुतीतील जागावाटपावरून तणाव वाढताना दिसत असून, भाजपने 'योग्य जागा न मिळाल्यास स्वबळावर निवडणूक लढवू असा इशारा दिल्याने अंतर्गत खदखद अधिकच वाढली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पारंपरिक बालेकिल्ले असलेल्या श्रीवर्धन, म्हसळा, तळा आणि माणगाव या तालुक्यांमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. यावेळी राष्ट्रवादीकडून स्वच्छ प्रतिमा असलेल्या आणि तरुण उमेदवारांना संधी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या निवडणुकीत जलजीवन मिशनची अंमलबजावणी, निकृष्ट रस्ते, रखडलेली शासकीय कामे तसेच प्रलंबित मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न हे प्रमुख मुद्दे ठरणार आहेत. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांबाबत असलेली नाराजी मतदारांच्या निर्णयावर परिणाम करणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

महायुतीतील या मोठ्या सत्तासंघर्षाचा फटका काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांसारख्या पक्षांना बसण्याची शक्यता असून, त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून सर्व जागांवर उमेदवार देण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे.

एकूणच, दक्षिण रायगडमधील ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांपुरती मर्यादित न राहता मोठ्या राजकीय रणभूमीत रूपांतरित होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या संघर्षात कोण बाजी मारणार आणि महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा