Mhasla Check Post | म्हसळा चेक पोस्ट येथे दिशादर्शक फलक लावण्याची जोरदार मागणी

म्हसळा | प्रतिनिधी : सुशील यादव
दिघी–पुणे राष्ट्रीय महामार्गावरील म्हसळा चेक पोस्ट हा म्हसळा तालुका शहराचा अत्यंत महत्त्वाचा नाका असून याच ठिकाणी माणगाव, श्रीवर्धन व गोरेगावकडे जाणारे प्रमुख राज्य मार्ग एकत्र येतात. तसेच या ठिकाणी म्हसळा पोलीस ठाण्याचा चेक पोस्टही कार्यरत आहे. मात्र, इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी आजतागायत स्पष्ट दिशादर्शक फलक न बसवण्यात आल्याने प्रवासी, पर्यटक तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
एमएसआरडीसीमार्फत खाजगी रस्ते विकासकांनी हा रस्ता विकसित केला असला, तरी म्हसळा चेक पोस्ट परिसरात दिशादर्शक फलकांचा अभाव असल्यामुळे वाहनचालकांना योग्य मार्ग निवडताना संभ्रम निर्माण होतो. विशेष म्हणजे, या ठिकाणी दिशादर्शक फलक बसवण्यासाठी खांब उभारण्यात आलेले असतानाही गेल्या दहा वर्षांपासून त्यावर एकही मार्गदर्शक पाटी लावण्यात आलेली नाही. काँक्रीट रस्ता होऊन दशक उलटले तरी ही गंभीर बाब संबंधित यंत्रणांकडून दुर्लक्षित राहिली आहे.
सध्याच्या पर्यटन हंगामात श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर यांसारख्या पर्यटनस्थळांकडे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत. रात्री अपरात्री परतीच्या प्रवासात अनेक वाहनचालक म्हसळा चेक पोस्ट परिसरात आल्यावर गोंधळात पडतात. दिशादर्शक फलक नसल्यामुळे मुंबई–गोवा महामार्गाकडे जाण्यासाठी नेमका कोणता मार्ग घ्यावा, हे स्पष्टपणे समजत नाही. काही वेळा चेक पोस्टवर पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याने वाहनचालकांची गैरसोय अधिक वाढते.
या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांनी तातडीने लक्ष देऊन म्हसळा चेक पोस्ट येथे स्पष्ट, दिशादर्शक व मार्गदर्शक फलक बसवावेत, अशी जोरदार मागणी म्हसळा येथील रहिवासी ग्रामस्थ व स्वयंसेवक प्रसाद जवळे यांनी केली आहे. योग्य दिशादर्शक फलक बसवल्यास प्रवासी, पर्यटक तसेच स्थानिक नागरिकांची गैरसोय दूर होऊन वाहतूक अधिक सुरळीत व सुरक्षित होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा