महादेव कांबळे आणि तुकाराम महाडिक यांचे घर मोठ्या नुकसानीस सामोरे; आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती कळवली
जांभूळ (ता. म्हसळा) – काल (दि. २८ मे) सायंकाळी आलेल्या वादळामुळे जांभूळ गावात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मुसळधार वारा आणि पावसाच्या तडाख्याने जांभूळ येथील आरोग्य उपकेंद्राची सर्व पत्रे उडून गेली असून इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या आरोग्य सेवा विस्कळीत झाली असून ग्रामस्थांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
वादळाचा फटका केवळ सार्वजनिक इमारतींनाच नाही, तर वैयक्तिक घरांनाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे. गावातील महादेव कांबळे यांच्या घरावरील कौले उडून गेली असून त्यांचे घर निसर्गाच्या तडाख्याने पूर्णतः उघडे पडले आहे. तसेच, तुकाराम महाडिक यांच्या घरावर नारळाचे झाड कोसळले असून घराचे छप्पर व संरचना मोठ्या प्रमाणावर कोसळली आहे.
या संपूर्ण घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा तहसीलदार मा. श्री. सचिन खाडे साहेब यांना तात्काळ कळविण्यात आली आहे. प्रशासनाच्या वतीने पंचनामा करून योग्य ती मदत लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
ग्रामपंचायत व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी तत्काळ पाहणी केली असून, संभाव्य धोक्याच्या ठिकाणी नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नारळाचे झाड कोसळलेले तुकाराम महाडिक यांचे घर – छायाचित्र: ग्रामस्थांकडून
Post a Comment