एस.टी. सेवा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी – प्रशासनाकडून दुर्लक्ष का?
कोकण रेल्वेच्या आगमनाने कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळाला असला तरी रेल्वे स्थानकावरून पुढे जाण्यासाठी कोणतीही ठोस वाहतूक व्यवस्था नसल्याने प्रवाशांची गैरसोय कायम आहे. मुंबई, पुणे, नाशिकसारख्या मोठ्या शहरांमधून येणारे अनेक प्रवासी माणगाव रेल्वे स्थानकावर उतरतात, मात्र पुढील प्रवासासाठी आवश्यक असलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी आहे.
यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. विशेषतः ट्रेनने गर्दीतून माणगाव गाठल्यानंतर स्थानकावर उतरल्यावर एस.टी. सेवा किंवा इतर सार्वजनिक वाहतूक नसल्याने अनेक प्रवासी अडकतात. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी माणगाव रेल्वे स्थानकावरून थेट एस.टी. सेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने होत आहे.
गर्दीतून माणगाव गाठायचं आणि मग पुढे प्रवासाचं साधन मिळणार का?
१) रेल्वेतून प्रवास म्हणजे नवा संघर्ष
मुंबई, ठाणे, पुणे या भागांतून येणारे अनेक प्रवासी पॅसेंजर किंवा इतर गाड्यांमधून माणगावपर्यंतचा प्रवास गर्दीतून करतात. विशेषतः सुट्टीच्या काळात आणि सणासुदीच्या दिवसांमध्ये ही गर्दी असह्य होते. उभ्या उभ्या प्रवास करावा लागतो, अनेकदा जागा मिळत नाही.
रेल्वेने गर्दीचा प्रवास करत करत माणगाव गाठल्यानंतर पुढे अजून एक संघर्ष सुरू होतो – स्थानकावर उतरल्यावर प्रवासाची कोणतीही निश्चित सोय नसते!
२) रेल्वे स्थानकावरून पुढे जाण्याचा मोठा प्रश्न
माणगाव रेल्वे स्थानक रायगड जिल्ह्यातील अनेक भागांसाठी मुख्य प्रवेशद्वार आहे. येथून श्रीवर्धन, म्हसळा, गोरेगाव, शृंगारतळी, दिवेआगर, हरिहरेश्वर, मंडणगड आणि पोलादपूर अशा अनेक ठिकाणी जाण्यासाठी लोक उतरत असतात.
मात्र, रेल्वे स्थानकावरून पुढे जाण्यासाठी कोणतीही थेट सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही.
रेल्वे स्थानक ते एस.टी. स्थानक: माणगाव एस.टी. स्थानक रेल्वे स्थानकापासून १.५ कि.मी. दूर आहे. हे अंतर कापण्यासाठी रिक्षा मिळतात, पण त्या महागड्या असतात.
थेट एस.टी. बस नाही: रेल्वे स्थानकावर उतरल्यावर थेट गावी जाणारी बस मिळत नाही. आधी एस.टी. स्थानक गाठावं लागतं आणि तिथेही बस मिळेल याची शाश्वती नाही.
रात्रीच्या वेळी मोठी समस्या: रात्रीच्या वेळेस रेल्वेने आलेल्या प्रवाशांसाठी अजिबात सोय नाही. कोणतीही बस सेवा नसल्याने अनेक प्रवाशांना रात्रभर वाट पाहावी लागते.
३) मनमानी भाडे घेणाऱ्या रिक्षाचालकांची दादागिरी
श्रीवर्धन, म्हसळा, दिवेआगरसाठी मोठे भाडे: लोकांच्या मजबुरीचा फायदा घेत रिक्षाचालक भरमसाट पैसे घेतात.
थेट एस.टी. सेवा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी
१) रेल्वे स्थानकावरून थेट एस.टी. बस सेवा सुरू करावी
रेल्वे स्थानकावर उतरलेल्या प्रवाशांसाठी थेट म्हसळा, श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर आणि अन्य ठिकाणी जाणाऱ्या बस सोडाव्यात.
रेल्वेच्या वेळेनुसार बस सुरू केल्यास प्रवाशांची मोठी सोय होईल.
२) रेल्वे स्थानक ते एस.टी. स्थानक अशी एसटी सेवा ट्रेन्स च्या टाईम नुसार सुरू करावी यामुळे प्रवाशांची लूट थांबेल.
३) रात्रीच्या रेल्वेसाठी विशेष एस.टी. व्यवस्था करावी
रात्री येणाऱ्या गाड्यांसाठी विशेष एस.टी. बसेस सोडाव्यात, जेणेकरून रात्री रेल्वेतून आलेल्या प्रवाशांना अडकून पडावे लागणार नाही.
४) अधिकृत रिक्षा सेवा सुरू करावी
रेल्वे स्थानकावरून गावांपर्यंत जाण्यासाठी प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करावी.ठराविक दर निश्चित करून प्रवाशांची फसवणूक थांबवावी.
कोकणात रेल्वे आली खरी, पण प्रवाशांना प्रवासाची सोय कधी मिळणार?
रेल्वे स्थानकावरून पुढील प्रवास सोयीचा नसेल, तर रेल्वे सुविधेचा पूर्ण उपयोग होऊ शकत नाही. कोकणातील रेल्वे स्थानकांवरून प्रवाशांसाठी थेट एस.टी. सेवा सुरू केली तरच हा मोठा प्रश्न सुटू शकतो.
माणगाव रेल्वे स्थानकावर उतरलेल्या प्रवाशांसाठी थेट एस.टी. सेवा सुरू करण्याचा निर्णय एस.टी. महामंडळाने घेतला, तर हा मोठा प्रश्न सुटू शकतो.
प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या मागणीकडे लक्ष द्यायला हवं!
रेल्वेने प्रवास सुकर झाला असला तरी, स्थानकावर उतरल्यावर प्रवाशांची होणारी गैरसोय संपवण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. कोकणवासीय आणि पर्यटकांसाठी प्रवास सुकर व्हावा, यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर थेट एस.टी. बस सेवा सुरू करावी, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.- हरीश पयेर, सामाजिक कार्यकर्ते मुंबई
Post a Comment