लढा गोवा मुक्ती संग्रामाचा...!


 
आजच्या पीढीने स्वत:च्या पायावर उभं राहून देशाचं नाव उज्ज्वल करावं   -स्वातंत्र्यसैनिक रामनाथ गायकवाड

भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत व त्या निमित्ताने संपूर्ण देशभरात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवाचे औचित्य साधीत गोवा मुक्ती संग्रामात सहभागी झालेले रायगड जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक श्री.रामनाथ सखाराम गायकवाड (वय 88) यांच्याशी संवाद साधून स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचा सहभाग, लढ्यातील योगदान व तेव्हाच्या त्यांच्या आठवणी, तेव्हाची परिस्थिती कशी होती तसेच त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल या मुलाखतीतून आपण जाणून घेवू...!
 
प्रश्न:- नमस्कार, आपल्याविषयी काय सांगाल?
उत्तर:- नमस्कार, मी रामनाथ सखाराम गायकवाड. माझा जन्म 1934 साली रामनवमीच्या दिवशी नागाव येथे झाला. माझे संपूर्ण बालपण नागाव येथेच गेले. नागाव मधीलच शाळेत माझे चौथीपर्यंत शिक्षण झाले. त्यानंतर मी नागाव मध्येच राष्ट्र सेवा दलाची शाखा होती. मी तेव्हा राष्ट्र सेवा दलामध्ये सहभागी झालो. त्यावेळी नागावचे नाना पाटील (जे आज हयात नाही आहेत) आमचे शाखाप्रमुख होते आणि श्री.दयानंद म्हात्रे हे माझे तिथे सहकारी होते. श्री.दत्ता राहाळकर हे माझे सहकारी होते. ते अनेकदा आम्हाला नाटकामध्ये काम करायला सांगायचे. मी सुद्धा ‘अखेरचे अश्रू’ या नाटकात काम केले आहे. त्यात मी आबा म्हणून एका म्हाताऱ्याची भूमिका केली होती.
 
प्रश्न:- आपल्या कुटुंबाविषयी काय सांगाल?
उत्तर:- माझे वडील सखाराम गायकवाड हे कीर्तनकार होते, ते ‘बुरुडबुवा’ म्हणून प्रसिद्ध होते व आई गृहिणी होती. माझ्या पत्नीचे नाव उषा. तिचे पाच वर्षांपूर्वी अल्पश: आजाराने निधन झाले. मला 3 मुले आणि 1 मुलगी अशी चार अपत्ये आहेत. माझा मोठा मुलगा उमेश. तो व्यवसाय करतो. दुसरी माझी मुलगी सौ.सरोज विजय गायकवाड. ती गृहिणी आहे. तिसरा मुलगा प्रवीण. तो इथेच स्थानिक कंपनीत कामाला आहे. चौथा मुलगा प्रसन्न. तो गुजरातच्या एका कंपनीमध्ये कामाला आहे. मला एकूण 12 नातवंडे आहेत आणि 10 पतवंडे आहेत.
 
प्रश्न:- आपण गोवा मुक्तीसंग्रामाशी कसे जोडले गेलात?
उत्तर:- मी ज्या ठिकाणी कामाला होतो तिथल्या युनियनचे प्रमुख होते श्री.हिरवे गुरूजी. तर त्यांनी आमच्या राष्ट्र सेवा दलाच्या शाखाप्रमुखांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत त्यांनी सर्वांना विचारलं की, ‘तुमच्यापैकी कुणी गोवा मुक्ती संग्रामात सहभागी होणार आहात का?’ त्यावेळी पहिलाच हात मी वर केला. त्यानंतर आणखी 2-4 जणं तयार झाले होते. बाकी सर्वजण निघून गेले. मग त्यानंतर मी आणि माझे सहकारी श्री.चिंतामण ठाकूर असे दोघेजण आमच्या गावातून गोवा मुक्ती संग्रामात सामील झालो.

मला आठवतंय, ज्या दिवशी आम्ही मुक्ती संग्रामासाठी निघणार होतो तो दिवस होता गोकुळाष्टमीचा. आम्ही गोविंदा खेळलो आणि आम्हाला सांगितलं गेलं की, ‘चला आता आपण निघूयात.’ मग राष्ट्र सेवा दलातील आमचे सर्व शाखाप्रमुख आणि आम्ही असे सर्वजण पनवेलला निघालो. नंतर आम्ही हिरवे गुरूजींच्या घरी गेलो. त्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईवरून ट्रेनने आम्हाला बेळगावला जायचं होतं. मग दुसऱ्या दिवशी व्ही.टी (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) स्टेशनवरून आम्ही ट्रेन पकडली आणि बेळगावला जाण्यासाठी निघालो. त्यावेळी आम्ही पन्नास ते साठ जणं होतो. तिसऱ्या दिवशी आम्ही ट्रेनने बेळगावला पोहोचलो. बेळगावला पोहोचल्यानंतर आम्हाला सर्व जिल्ह्यातील लोकं भेटली.

एक गोष्ट मला आठवतेय. आम्ही जेव्हा पुण्याला थांबलो होतो तेव्हा आम्ही सगळेजण भिक्षा मागायला गेलो होतो. म्हणजे रोटी वगैरे अशी काही भिक्षा आम्ही मागायला गेलो. त्यावेळेला आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या रोटी म्हणजे पोळी, पुरणपोळी ते साध्या चपातीपर्यंत मिळाल्या. त्या मग आम्ही बेळगावला जाताना सर्वांनी खाल्ल्या.
 
 
प्रश्न:- त्यावेळी आपले वय काय होते?
उत्तर:- त्यावेळी मी 22 वर्षांचा होतो. विशेष म्हणजे तेव्हा उपस्थित असलेल्यांमध्ये सगळ्यात लहान मी होतो. बाकीचे माझे जे सहकारी होते ते सर्व माझ्यापेक्षा वयाने मोठे होते. त्यामुळे माझ्याकडे सगळ्यांचे जास्त लक्ष असायचं.

प्रश्न:- बेळगाववरून मग आपला पुढचा प्रवास कसा होता?
उत्तर:- बेळगावला गेल्यानंतर आम्ही तिथून सावंतवाडीला चालत गेलो. सावंतवाडीला गेल्यानंतर आम्ही बाजूच्या एका गावात, मला गावाचं नाव आता आठवत नाहीये. पण त्या गावात आम्ही वस्तीला राहिलो. तिथून आम्ही गोवा सीमेच्या जवळ असलेल्या एका गावातून गोव्यामध्ये घुसलो. गोव्यात घुसल्यानंतर तिथे पोलिसांनी गोळीबार केला. त्यावेळी त्यातील एक गोळी हिरवे गुरूजींना लागली. गोळी लागल्याने गुरूजी खाली कोसळले. त्यांना तात्काळ उचलून आम्ही पुढे जायला लागलो. पण त्यावेळी गोळी लागल्याने ते कासावीस झाले होते. गोळी त्यांच्या छातीला लागली आणि ते हुतात्मा झाले. त्यानंतर दुसऱ्यांदा गोळीबार झाला. तेव्हा रेवदंड्याचे श्री.शेषनाथ वाडेकर हे बाहेर चालले होते, गावात घुसत होते तेव्हा त्यांनाही गोळी लागली. त्यानंतर आम्ही जेव्हा पुढे गेलो तेव्हा आमच्यावर लाठीचार्ज झाला. या लाठीचार्जमध्ये माझ्या डोक्याला जखम झाली होती. माझ्या हाताच्या मधल्या बोटाला गोळी चाटून गेली होती. पण सुदैवाने जास्त काही झालं नाही. त्या बोटाचं फक्त नख उडालं होतं. मात्र तरीसुद्धा त्या अवस्थेत, ती परिस्थिती सहन करून आम्ही पुढे जात राहिलो.

पुढे मग आम्ही तेरेखोल किल्ल्यात गेलो. आम्हाला तिथेच वस्तीला ठेवण्यात आलं. त्याच्यानंतर मग आम्ही हिरवे गुरुजींना घेऊन एका गावामध्ये आलो. त्या गावात पोहोचल्यावर आम्हाला तिथे जेवण दिलं गेलं. मात्र आम्ही कुणी जेवलो नाही. लाठीचार्जमध्ये आमच्यातले काहीजण दुखापतीमुळे रुग्णालयात गेले होते. त्यानंतर मग तिथे मुक्ती संग्रामात सामील होण्यासाठी जवळपास 400 ते 500 स्वातंत्र्यसैनिक जमा झाले होते. त्याच्यानंतर मग आम्हाला तिथून हाकलण्यात आलं, बाहेर काढलं गेलं. तिथून बाहेर काढल्यानंतर मग आम्ही आपले सगळे लोक जिथे होते त्या ठिकाणी गेलो.

मग आम्ही हिरवे गुरुजींचे प्रेत घेऊन अरविंदा नावाचे एक गाव आहे तिथून लॉरीने निघालो. त्यानंतर मग आम्ही पनवेलला आलो आणि मग रेवदंड्याला त्यांचा दफनविधी वगैरे झाला. त्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि उरणला आलो.
 
प्रश्न:- तुमचा हा संघर्ष किती काळ चालला होता?
उत्तर:- आमचा हा संघर्ष साधारणत: तीन ते चार तास चालला आणि त्यानंतर आम्हाला बाहेर काढण्यात आलं.
 
प्रश्न:- आपणास तुरुंगवास झाला होता का?
उत्तर:- नाही. तुरुंगवास वगैरे काही झाला नाही. फक्त तिथे एका ठिकाणी जमवले होते. तिथून बाहेर काढल्यानंतर मग ती सीमा आपल्या ताब्यात दिली गेली. त्यानंतर आमची राष्ट्र सेवा दल जी संघटना होती त्या सगळ्यांना आमच्यासह ताब्यात घेतलं आणि मग तिथून आम्हाला एके ठिकाणी सभागृहात जमा केलं. त्यानंतर ताबडतोब लॉरी ठरवली गेली आणि त्या लॉरीमध्ये आम्हाला ठेवलं गेलं. त्यामध्ये शेषनाथ वाडेकर नव्हते, ते कुठेतरी गायब झाले होते. आजपर्यंत त्यांचा काही पत्ता लागला नाही.

प्रश्न:- गोवा मुक्ती संग्रामाच्या दरम्यान आपणास कशाची भीती वगैरे वाटली नाही का?
उत्तर:- नाही. भीती वाटण्याचा प्रश्नचं नव्हता. आम्ही कोणत्याही तणावाखाली नव्हतोच. आमच्यातील काहीजणांना रुग्णालयात दाखल केलं होतं. पण काशिनाथ आणि मी तर, आम्ही बॉडीगार्डप्रमाणे होतो.
 
प्रश्न:- आपल्या जीवनावर कोणाचा जास्त प्रभाव आहे? म्हणजे आपण कोणत्या विचारांना मानता?
उत्तर:- मी महात्मा गांधीजींच्या विचारांना मानतो. साने गुरूजींच्या विचारांना मानतो. त्यांच्या विचारांचा प्रभाव जास्त आहे. तसेच गावातील जी ज्येष्ठ मंडळी होती त्यांचा माझ्यावर प्रभाव आहे.
 
 
प्रश्न:- आपण उरणला आल्यानंतर काय केले?
उत्तर:- उरणला आल्यानंतर मग आम्हा सगळ्यांचा सत्कार करण्यात आला, अभिनंदन करण्यात आलं. त्यानंतर सर्वांना मी मुक्ती संग्रामाच्या झालेल्या घटनांची माहिती दिली. नंतर लोकांकडून मला आदरार्थी वागणूक मिळायला लागली, आणि मी पण त्याप्रमाणे राहिलो. त्यानंतर 1957 साली माझं लग्न झालं. माझी सासुरवाडी रेवदंडा आहे. तेव्हा मी शेषनाथ वाडेकर यांना शोधायला गेलो होतो. त्यांचे कोण नातेवाईक आहे ते पाहिलं. त्यांची पत्नी आणि मुलगा हे अजूनपर्यंत माझ्या संपर्कात आहेत. मात्र श्री.शेषनाथ वाडेकर यांच्याबाबत अजूनही काहीही माहिती मिळालेली नाही.
 
प्रश्न:- उरणला आल्यानंतर आपण नोकरी केली की व्यवसाय?
उत्तर:- लग्न झाल्यानंतर कौटुंबिक जबाबदारीमुळे काहीतरी व्यवसाय किंवा नोकरी करायलाच हवी होती. उरणच्याच ग्रॅनडोअर कंपनी मध्ये मी फिटर म्हणून कामाला लागलो. त्यावेळी मला दिवसाला साडेचार रुपये पगार होता.
 
प्रश्न:- आपली आधीची आर्थिक परिस्थिती कशी होती?
उत्तर:- काही नाही, माझी आधीची आर्थिक परिस्थिती सर्वसामान्यच होती. माझे आई-वडील बुरुडधंदा आणि शेती करायचे. आमचा भाजीचा मळा होता आणि एक विहीर होती जी एका मुस्लिम व्यक्तीने पाडून दिली होती. मी कंपनीत कामाला लागलो, लग्नानंतर मला मुलगा झाला आणि मी संसाराला लागलो. परंतू मला स्वातंत्र्यसैनिक असण्याचा जो मान होता, तो तसाच राहिला. सर्वजण मला मान द्यायचे आणि आजही देत आहेत.

प्रश्न:- आपणास शासकीय योजनांद्वारे काही लाभ मिळाला आहे का?
उत्तर:- हो तर. मला आता दर महिन्याला केंद्र सरकारकडून तीस हजार आणि महाराष्ट्र सरकारकडून दहा हजार असं जवळजवळ चाळीस हजार रुपये पेन्शन मिळते. अगदी पाऊणे दोनशे पासून जी पेन्शन सुरू झाली ती आता चाळीस हजार पर्यंत आहे. मी पूर्णत: सुखी समाधानी आहे. कसं आहे माहितीये का, आम्हाला आमच्या अपेक्षेपेक्षाही पुष्कळ मिळतंय. मी कुठलीही अपेक्षा केली नव्हती. पण जे काही मिळतंय ते इतकं भरपूर आहे की, ते मला आयुष्यभर पुरेल.
 
प्रश्न:- आपणास अन्य काही सुविधा मिळतात का?
उत्तर:- हो. एसटीचा आणि रेल्वेचा पास आहे. त्या पासवर मी प्रवास करतो. मात्र मागील दोन वर्षे एकंदर परिस्थितीमुळे प्रवास नाही केलाय. आणखी एक की, वडिलांमुळे आम्हाला प्रवासाचीही आवड होती. तेव्हाही बराच प्रवास केला.
 
प्रश्न:- तुम्हाला शासनाच्या ज्या सवलती मिळतात त्यात तुम्ही समाधानी आहात का?
उत्तर:- समाधानी म्हणजे मी पुष्कळ समाधानी आहे. मी त्याप्रमाणे दानधर्म करतो. गरजूंना शक्य तेवढी मदत करतोच. त्याचबरोबर ज्या निराधार विधवा भगिनी आहेत, त्यांना त्यांच्या उदरनिर्वाहाकरिता दरमहा काही रक्कम देतो. आणखीन असं की, मी सध्या लायन्स क्लबचा सदस्यही आहे आणि पूर्वी अध्यक्षही होतो., आमच्या इथे जे नवीन राम मंदिर बांधण्यात आलं आहे, त्यासाठी मी देणगी स्वरूपात माझ्या पत्नीच्या नावे 51 हजार आणि आईच्या नावे 10 हजार रुपये मदत केली आहे.
 
प्रश्न:- आपणास निवांत वेळ मिळतो तेव्हा आपण काय छंद जोपासता, आपणास आवड कसली आहे?
उत्तर:- मला वृद्धाश्रम सुरू करायचा आहे. शासनाने जर आम्हाला जागा देऊ केली तर निश्चितच वृद्धाश्रम सुरु करायचा मानस आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
 
प्रश्न:- आजच्या पिढीला तुम्ही काय संदेश द्याल?
उत्तर:- माझी इच्छा अशी आहे की, प्रत्येकाने निर्व्यसनी राहावं. त्यांनी शिक्षण पूर्ण करून स्वत:च्या पायावर उभं राहावं आणि देशाचं नाव उज्ज्वल करावं. सगळ्यांना एकच सांगणे आहे की, सगळ्यांनी माणुसकी हा आपला धर्म समजून तो सांभाळावा. प्रत्येकानी माणसासारखंच वागावं. कोणालाही बनवाबनवी करून फसवू नये. आयुष्य काबाडकष्ट करूनसुद्धा जगता येतं आणि ते जगण्यासाठी जिद्द पाहिजे. त्यासाठी हिम्मतीने प्रयत्न केले तर यश आपोआप मिळतं.
चांगल्या तऱ्हेने राहावं, सच्चाईने राहावं आणि सच्चाईने जगावं. मी जी काही वडिलोपार्जित संपत्ती ती दानधर्म करून वाटून टाकली. भावांना देऊन टाकली, मी ठेवली नाही आणि कोणती अपेक्षाही नाही.
आपण सगळ्यांनी माणुसकीने माणूस म्हणून जगावं. आपण आपले कर्तव्य करावे, कर्तबगारी दाखवावी आणि कर्तबगार माणसासारखे जीवन जगावं.
 
महिती संकलन - मनोज शिवाजी सानप, जिल्हा माहिती अधिकारी, रायगड-अलिबाग

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा