भगवान बिरसा मुंडा जयंती, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व जनजाती गौरव सप्ताहनिमित्त "कातकरी उत्थान अभियान" राबविणार -जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर
कातकरी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सप्तसूत्रीचा करणार अवलंब
भगवान बिरसा मुंडा जयंती, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व जनजाती गौरव सप्ताह अंतर्गत आदिवासींकरिता "कातकरी उत्थान अभियान" राबविणार असल्याची घोषणा जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी नुकतीच येथे केली.
भगवान बिरसा मुंडा जयंती, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व जनजाती गौरव सप्ताह अंतर्गत आदिवासींकरिता जनजागृती कार्यशाळा जिल्हा नियोजन भवन सभागृहात गुरुवार,दि.18 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे, उप वनसंरक्षक आशिष ठाकरे, सहायक वनसंरक्षक विश्वजीत जाधव, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,पेण श्रीमती शशिकला अहिरराव, तहसिलदार मिनल दळवी, सचिन शेजाळ, श्रमिक क्रांती संघटनेचे दिलीप डाके, अहिल्या महिला मंडळाच्या अश्विनी गाडगीळ, सर्व विकास दीप संस्थेचे फादर रिचर्ड उर्फ रिची भाऊ, आदिवासींसाठी काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्था, आदिवासी बंधू-भगिनी, ग्राम साथी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर पुढे म्हणाले की, आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबध्द असून त्यांना रेशनकार्ड, आधारकार्डचे 100 टक्के वितरित करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या 11.58 टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या या घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी "कातकरी उत्थान अभियान" यासारखे उपक्रम राबविण्यासाठी शासन व जिल्हा प्रशासन कटिबध्द आहे.
आदिवासींना विविध शासकीय योजनांचे सर्वोतोपरी लाभ मिळवून देण्यासाठी, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद तसेच अन्य विविध शासकीय विभाग एकत्रितपणे काम करणार आहेत. आपल्या जिल्ह्यातील आदिवासींच्या सर्वांगीण विकासाकरिता सप्तसूत्री तयार करण्यात येत असून त्या अंतर्गत आदिवासी बांधवांशी संवाद, विविध प्रशासकीय यंत्रणांच्या आपापसातील समन्वयातून आदिवासी बांधवांना शासकीय योजनांचा पूर्ण लाभ, दर महिन्याला आदिवासी प्रकल्प विकास अधिकाऱ्यांच्या समन्वयातून आदिवासींसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांसोबत बैठक, आदिवासी समाजातील घटकांचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्याची मोहीम तसेच विविध कर्ज मेळावे, पोलीस व सैन्य भरती स्पर्धा परीक्षा केंद्राच्या अनुषंगाने दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून आदिवासी युवक-युवतींना विनामूल्य मार्गदर्शन व प्रशिक्षण, त्यांना उत्तम कार्य करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, वन हक्क, वन पट्टे दाव्याबाबत प्रलंबित कार्यवाही प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर, श्रम कार्डाचे वितरण, कोविड लसीकरण, बालविवाह रोखण्यासाठी आवश्यक प्रबोधन, स्थलांतर रोखण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न,त्यासाठी या आदिवासी बांधवांकरिता शाश्वत उपजिविकेसाठी पर्याय उपलब्ध करून देणे, अशा विविध बाबींवर जिल्हा प्रशासनाकडून येणाऱ्या काळात विशेष काम करण्यात येणार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी कातकरी उत्थान अभियानाची दिशा व कार्य स्पष्ट केले.
या जनजागृती कार्यशाळेच्या निमित्ताने उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी संरक्षित वनपट्टे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी वनहक्क कायदा, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,पेण श्रीमती शशिकला अहिरराव यांनी आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना आणि उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे यांनी मतदार नोंदणी याविषयी सादरीकरणाच्या माध्यमातून उपस्थित आदिवासी बांधवांना विशेष माहिती दिली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदिवासी विभागातील विविध सेवाभावी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा, महामाहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार झालेल्या कातकरी महिला बचतगटाचा, कायदेविषयक पदवी मिळविणारी कातकरी समाजातील पहिली व्यक्ती होण्याचा मान मिळालेले रवींद्र पवार यांचा तसेच कोविड लसीकरणाची उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या वैद्यकीय पथकाचा जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदिवासी लाभार्थ्यांना वनपट्टेधारक, जातीचे प्रमाणपत्र तसेच विविध शासकीय योजनांतर्गत धनादेशाचेही वितरण करण्यात आले.
यावेळी आदिवासींकरिता काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था व उपस्थित आदिवासी बांधवांच्या वतीने दिलीप डाके, भगवान नाईक आणि कायदेविषयक पदवी मिळविणारी कातकरी समाजातील पहिली व्यक्ती होण्याचा मान मिळालेले रवींद्र पवार यांनी मनोगत व्यक्त करून जिल्हा प्रशासनाने असा जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल प्रशासनाचे विशेष आभार मानले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोळघर शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट असे आदिवासी पारंपारिक नृत्य सादर केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गोविलकर यांनी केले तर सहाय्यक प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Post a Comment