दिघी व आगरदांडा जेट्टी समस्यांच्या गर्तेत ; मेरिटाईम बोर्ड लक्ष देईल का ?

  •  रात्रीच्या वेळी वीज नाही
  • स्वच्छतागृह नसल्याने महिलांची गैरसोय
  • निवारा शेडला छत नसल्याने उन्हातच उभे राहण्याची वेळ

बोर्लीपंचतन (अभय पाटील) । श्रीवर्धन तालुक्यातील दिघी व मुरुड तालुक्यातील आगरदांडा प्रवासी जेट्टीच्या ठिकाणी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने बांधलेल्या प्रशस्त इमारती केवळ देखावा आहे की काय? असा प्रश्न पडला आहे. याठिकाणी या ठिकाणी रात्रीच्या वेळी वीज नाही, स्वच्छतागृह नाही, निवारा शेडला छत नाही, अशा एक ना अनेक समस्या आहेत. याकडे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड लक्ष देईल का? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित विचारला जात आहे.

श्रीवर्धन व मुरुड हे दोन्ही तालुके पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे तालुके आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर तर मुरुडमध्ये जंजिरा किल्ला, मुरुड, काशिद त्याचप्रमाणे अलिबाग या जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय कामासाठी तसेच वैद्यकीय कामासाठी जाण्यासाठी या मार्गावरुन जनतेची वर्दळ असते. मुरुड व श्रीवर्धन या दोन्ही तालुक्यांमध्ये राजपुरी खाडी असल्याने या खाडीमध्ये दिघी व आगरदांडा या ठिकाणी जलवाहतुकीसाठी प्रवासी जेट्टी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून मागील 5 वर्षांपूर्वी उभारण्यात आल्या आहेत.

आगरदांडा येथे असलेली प्रशस्त इमारत फक्त शोभेची वास्तू झाली आहे. या इमारतीचा नक्की उपयोग काय आहे? हाच प्रश्न आहे; कारण बांधकाम झाल्यापासून ही इमारत बंद स्थितीमध्येच आहे. तर दिघी येथे असलेल्या इमारतीचा फायदा कोणत्याही प्रकारे येथून प्रवास करण्यार्‍या पर्यटक किंवा नागरिकांना होताना दिसत नाही.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दिघी येथील इमारतीमध्ये एक उपहारगृह चालू करुन मेरिटाईम बोर्डाने त्यातून भाडे मिळण्याचे काम केले आहे. परंतु दोन्ही जेट्टीवर प्रवाशांना बसण्यासाठी निवारा शेड नसल्याने उन्हामध्येच ताटकळत उभे रहावे लागत आहे. तर दोन्ही ठिकाणी स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने विशेषतः महिलांची यामध्ये गैरसोय होत आहे.



आगरदांडा जेट्टीवरील बंद अवस्थेतील स्वच्छतागृह.

आगरदांडा जेट्टीवर स्वच्छतागृह आहे, मात्र ते बंद असून त्याचा कोणताही लाभ प्रवाशांना होत नाही. वीज बंद अवस्थेत असल्याने रात्रीच्या वेळी याठिकाणी अंधारात चाचपडत जाण्याची वेळ येते. मेरिटाईम बोर्डाने दोन्ही जेट्टींच्या ठिकाणी असणार्‍या गैरसोई दूर करण्याची मागणी प्रवासीवर्गातून केली जात आहे.


दिघी, आगरदांडा या दोन्ही ठिकाणी जेट्टी व मेरिटाईम बोर्डाच्या इमारती उभारल्या आहेत; पण याचा लाभ नागरिकांना मिळत नाही. या ठिकाणी नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे प्रशासनाने येथील गैरसोयी दूर कराव्यात. जेणेकरुन पर्यटनासही फायदा होईल.

- विशाल पिळणकर, नागरिक


आगरदांडा जेट्टीवरील इमारत भाडे तत्वावर देणे आहे. यासाठीची प्रक्रिया लवकरच होईल. दोन्ही ठिकाणी शौचालयाची व्यवस्था होईल तर आगरदांडा जेट्टीवरील बंद असलेली वीजदेखील दोन दिवसांत चालू होईल. तर निवारा शेडसाठी इमारत खुली होईल.

- कॅप्टन सी.जे. लेपांडे, प्रादेशिक बंदर अधिकारी, रायगड


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा