खरसई येथे शेतकऱ्यांसाठी एकात्मिक रोग आणि कीड व्यवस्थापन मार्गदर्शन संपन्न.



संजय खांबेटे म्हसळा 
म्हसळा तालुक्यातील खरसई येथे डॉ.बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली बी. एस.सी.ॲग्रीची विध्यार्थीनी  नम्रता चौधरी हिने ग्रामीण जागृती कार्यानुभव उपक्रमांतर्गत पंचक्रोशीतील महिला शेतकरी वर्गाला एकात्मिक रोग आणि कीड व्यवस्थापन मार्गदर्शन केले. नम्रता हिने शेतकऱ्यांना पिक वाढीसाठी शेतात रासायनिक औषधांचा अतिवापर,त्यावरील भरमसाठ खर्च,आवश्यक साधनसामग्री,मजूर तसेच औषधांच्या वापरामुळे उद्भवणारी प्रदूषण समस्या या सर्वांचा विचार करता एकात्मिक रोग आणि कीड व्यवस्थापन ही काळाची गरज असल्याचे सांगितले.शेत मशागत पध्दती,सुधारित यंत्रे व तंत्रज्ञान, जैविक,भौतिक,रासायनिक उपाययोजना इत्यादी बाबींचा एकत्रित व पध्दतशीर वापर करून पर्यावरणाचे संतुलन अबाधित राखून रोगांची, किडींची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली आणण्यास अवलंबि लेल्या उपाययोजनेलाच  'एकात्मिक रोग आणि कीड व्यवस्थापन'असे संबोधले जात असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी पीक संरक्षणाच्या एकात्मिक व्यवस्थापनाची तत्त्वे अनुकरण करताना रोग व किडींच्या तीव्रतेचे अनुमान काढून होणाऱ्या नुकसानीची किंवा इथेच पातळी ठरविणे (प्रादुर्भाव व तीव्रता सीमा) उदा.भात पिकांमध्ये ५% खोडकीडग्रस्त फुटवे किंवा प्रती चौ.मी.क्षेत्रात एक अंडीपुंज नंतर सापडल्यास रासायनिक नियंत्रण फायदेशीर ठरते,किडींच्या संख्येची किंवा रोगाच्या प्रादुर्भाव तीव्रतेची व्याप्ती कमी करण्यासाठी किंवा मूलभूत तत्त्वांचा वापर करुन एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी योजना तयार करणे,आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास निसर्गाचा समतोल कमीत कमी बिघडेल असे नियंत्रणाचे उपाय योजणे गरजेचे असते.एकात्मिक रोग आणि कीड व्यवस्थापनामुळे राष्ट्रीय अर्थव्यवस्था पूरक होते,निसर्गाचा समतोल कायम राखला जातो,रासायनिक औषधांच्या अति वापरामुळे उद्भवणारे धोके कमी होतात,उपयुक्त किडी व सूक्ष्म जीव यांचे संरक्षण होण्यास मदत होते.आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात महिला शेतकऱ्यांच्या प्रश्नांना नम्रता हिने अतिशय सोप्या भाषेत उत्तरे दिली यावेळी कविता पाटील,भावना शहा, हिरा शितकर,पिठीबाई शितकर,चांगुणा शितकर,प्रणिता  कांबळे आदी महीला शेतकऱ्यांनी  सहभाग नोंदवला.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा