म्हसळा -प्रतिनिधी
म्हसळा एसटी स्थानक ते न्यु इंग्लिश स्कूल आणि दिघी नाका ते तोंडसुरे येथील नागरी वाहतुकीचा आणि शहरातील रहदारीचा दोन ते तीन किलोमीटर अंतराचा राज्य मार्ग खासगी कंपनीच्या अवजड वाहतुकीने पूर्णपणे नादुरुस्त झाला आहे.या रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करून मिळावी यासाठी म्हसळा पंचायत समितीचे माजी सभापती महादेव पाटील तसेच 18 गाव आगरी युवा संघ मुंबईच्या कार्यकारणीने म्हसळा तहसीलदार आणि पोलिस ठाण्यात स्वतंत्र निवेदन दिले. प्रभारी तहसीलदार के.टी.भिंगारे यांना निवेदन सादर करताना महादेव पाटील यांच्या समावेत,सरपंच अनंत नाक्ती,18 गाव आगरी युवा संघाचे कार्याध्यक्ष गोविंद भायदे,उपाध्यक्ष नामदेव शितकर,तुकाराम भायदे, रघुनाथ भायदे,जगन्नाथ नाक्ती उपस्थित होते.रस्ता दुरुस्ती करणे बाबत मागणी केलेल्या निवेदनात माहिती नमूद करताना सातत्याने वर्दळ असलेल्या या रस्त्यावर एसटी,खासगी ट्रान्सपोर्टची मालवाहतूक वाहने तसेच दिघी पोर्ट,दासऑफशोअर कंपनी,जे.एम. म्हात्रे कंस्ट्रक्शन कंपनीच्या माल वाहतूकीच्या अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी असते.अवजड वाहतुकीने वरील रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे या रस्त्यावरू न प्रवास करताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे.तालुका बाजारपेठेत खरेदी आणि शासकीय सेवाकामी येत असलेले वृद्ध,उपचारासाठी येणारे रुग्ण,गरोदरमाता,विद्यार्थी,ग्राहक,पर्यटक आणि स्थानिक पातळीवरील रहिवाशांचे अतोनात हाल होत आहेत. विकास कामांच्या नावाखाली म्हसळा शहरातील नागरी वाहतुकीच्या रस्त्याचा वापर अवजड माल वाहतूक करण्या साठी केला जात असताना त्याची देख भाल दुरुस्ती करणे आवश्यक आहे. गेली 10 वर्षे झाली तरी पर्यायी मार्गाचे रडगाणे चालूच आहे.मात्र रस्ता दुरुस्ती करणे बाबीकडे शासनाचे बांधकाम विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून सर्वसामान्य माणसाला त्रास देत असल्याचे माजी सभापती महादेव पाटील यांनी निवेदनात नमुद केले आहे.विकास कामाला आमचा विरोध नाही पण जनतेला मरण यातना देऊन तो विकास कितपत योग्य असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.नव्याने म्हसळा एसटी स्थानक ते न्यु इंग्लिश स्कूल आणि दिघी नाका ते तोंडसुरे या रस्त्याचे नवीन बांधकामासाठी निधीची मंजुरी करण्यात आली असल्याचे खासदार सुनिल तटकरे यांनी जाहीर केले आहे परंतु नवीन बांधकाम होई पर्यंत शासनाने अवजड वाहतूक करणा ऱ्या कंपनी कडुन रस्त्याची दुरुस्ती करून घेणे गरजेचे आहे.रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खासगी कंपनीच्या वाहतुकिला आमचा विरोध असेल आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलेच तर कंपनीच्या गाड्यांचा रस्ता रोखू असे समाजसेवक महादेव पाटील,18 गाव आगरी युवा संघ मुंबई चे पदाधिकारी कार्याध्यक्ष गोविंद भायदे,उपाध्यक्ष नामदेव शितकर यांनी विनंती वजा इशारा दिला आहे.
Post a Comment