खा. संभाजीराजे यांचा शासनाला प्रस्ताव
माणगाव:- तळीये दुर्घनाग्रस्तांचे पुर्नवसन रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाडजवळ करण्याचा प्रस्ताव खा. संभाजीराजे यांनी शासनाला दिला आहे. रायगड विकास प्राधिकरणकडे 80 एकर जागा आहे, त्यापैकी तीन एकर जागा तळीये गावाच्या पुनर्वसनासाठी देता येईल, असे असे त्यांनी म्हटले आहे.
तळीये या गावी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे 84 जण मृत्यूमुखी पडले आहेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या या दुर्घटनेत तळीये गाव पूर्णतः विस्थापित झाले असून या गावाचे पुनर्वसन करण्यासाठी ‘म्हाडा’ तयार आहे. मात्र, तळीये गावाच्या जवळपास शासनाकडे योग्य जमीन उपलब्ध नसल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले आहे. त्यामुळे पाचाड येथील तीन एकर जागेवर त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी सूचना संभाजीराजे यांनी केली आहे.
रायगड विकास प्राधिकरणकडे रायगडच्या पायथ्याशी पाचाड येथे 80 एकर जमीन संपादीत करण्यात आलेली आहे. याठिकाणी प्राधिकरणामार्फत शिवकालीन वस्तूसंग्रहालये व माहिती व इतिहास संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. यातील तीन एकर जागा तळीये गावाच्या पुनर्वसनासाठी देण्याची इच्छा आपण गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे व्यक्त केली असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.
या गावाचे पुनर्वसन करीत असताना येथील घरांची रचना ऐतिहासिक शिवकालीन धाटणीने करून, स्थानिक संस्कृतीचे पुनरूज्जीवन करून या गावास जागतिक दर्जाच्या पर्यटनाशी जोडण्याची संकल्पना त्यांनी मांडली आहे. असे झाल्यास पुनर्वसनाबरोबरच पर्यटनाच्या माध्यमातून या ग्रामस्थांना रोजगारही उपलब्ध होईल, अशी संकल्पना मांडली आहे. यावर डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी या प्रस्तावावर सकारात्मक भूमिका दर्शवली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच याविषयी तळीये ग्रामस्थांशी चर्चा केली असता ग्रामस्थ यासाठी तयार आहेत. मात्र, तळीये ते पाचाड जवळपास 40 किमीचे अंतर पाहता शेतीसाठी येणार्या अडचणी त्यांनी सांगितल्या. यावर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी तळीये येथील शेतजमिनी शासनाच्या ताब्यात घेऊन तितक्याच क्षेत्राच्या शेतजमिनी पाचाड भागात देण्याबाबत प्रयत्न करु, असे सांगितले आहे
Post a Comment