अंबिका कुटीर योगतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा



रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी  व्यायाम व योगासने महत्वाची - रामचंद्र सुर्वे


ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : आज संपूर्ण जगात कोरोना महामारीचे संकट असतांना योगाभ्यासाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. जगाने योगाला राजमान्यता दिली आहे. आपण शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यावर भर दिला पाहिजे. सर्वांनी आत्मनिर्भर बनले पाहिजे.  आजच्या काळात दररोज योगसाधना, नियमित व्यायाम आणि योगासन करणे गरजेचे आहे. आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी व्यायाम व योगासने करणे महत्वाचे आहे. असे स्पष्ट प्रतिपादन अंबिका कुटीर योगचे सचिव  रामचंद्र सुर्वे यांनी योगदिनी व्यक्त केले. 
आज ठाणे येथील अंबिका कुटीर योगमध्ये भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार  ऑनलाईनद्वारे आंतरराष्ट्रीय योगदिन संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील कुलकर्णी यांनी केले.
याप्रसंगी रामचंद्र सुर्वे यांनी आपल्या मार्गदर्शनात पुढे सांगितले की, गेली ५५ वर्षे आम्ही हठयोगी निकम गुरुजी यांनी स्थापन केलेल्या अंबिका कुटीर योगतर्फे देश विदेशात योगाभ्यास वर्ग घेतो, योगामुळे सर्व सुखी व निरोगी  होतात. केवळ संपत्तीत सुख नसून चांगले आरोग्य ठेवणे यामध्ये सुख आहे, त्यासाठी एक दिवस नव्हे तर दररोज योगासने केली पाहिजे.
याप्रसंगी कपालभाती, मकरासन, अंजलीमुद्रा, उष्ट्रासन, अर्धउष्ट्रासान, सेतुबंधासान, अर्धहलासन अशी विविध योगासने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तुषार   नेगांधी यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा