मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ज्ञानदीप मंडळ संचालित सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय सत्पाळा विरार पश्चिम यांच्या मराठी विभाग आणि ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत रुईया महाविद्यालयाच्या गार्गी गणेश मयेकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
महाविद्यालयाच्या आई क्यू ए सी अंतर्गत मराठी विभाग आणि ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे संरक्षण करावे या उद्देशाने ५ आणि ६ जून या दोन दिवसांत राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत गडचिरोली ते मालवण पर्यंत ४२ महाविद्यालयीन विद्यार्थांनी चित्रफितीच्या अर्थात व्हिडीओच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
सदर स्पर्धा अतिशय सुंदररीत्या आयोजित करण्यात आली म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुभाष डिसोझा यांनी दोन्ही विभागांचे कौतुक केले. अशा स्पर्धा विद्यार्थी मित्रांना कला विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरतात, अशी भूमिका ज्ञानदीप मंडळाचे अध्यक्ष फ्रान्सिस तुस्कानो यांनी मांडली.
सदर राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत वर्षा खंकाळ (चेतन दत्ताजी गायकवाड इंग्लिश मिडीयम स्कूल खडकी, पुणे) हिने द्वितीय क्रमांक पटकाविला तर श्रावणी खोत (ना. अ. दे. टोपीवाला ज्युनियर कॉलेज, मालवण), काजल जाधव (सौ. वेणुताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्यु. कॉलेज फलटण) यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला.
प्राध्यापक विजय काकडे, प्राध्यापक निखिल नाईक आणि साहित्यिक अनुराधा आटोळे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल डॉ. दिनेश सनदी आणि मराठी विभाग प्रमुख जगदीश संसारे यांनी अथक परिश्रम घेतले.
Post a Comment