पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून माणगावात लवकरच साकारणार "मेगा लेदर फूटवेअर ॲण्ड ॲक्सेसरीज क्लस्टर" योजना


"मेगा लेदर फूटवेअर ॲण्ड ॲक्सेसरीज क्लस्टर" योजनेचा प्रस्ताव राज्य शासनाने पाठविला केंद्र शासनाकडे


 
टीम म्हसळा लाईव्ह

        जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील रातवड येथे भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयांतर्गत "मेगा लेदर फूटवेअर ॲण्ड ॲक्सेसरीज क्लस्टर" ही योजना लवकरच साकारण्यात येणार आहे.    
    याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाने अंतिम मंजुरीसाठी नुकताच केंद्र शासनाकडे पाठविला आहे. यासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी संबंधिताकडे वारंवार पाठपुरावा करून या प्रकल्पास मार्गी लावण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
       फेब्रुवारी 2021 मध्ये संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या (लिडकॉम) संचालक मंडळाच्या मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात येऊन "मेगा लेदर फूटवेअर ॲण्ड ॲक्सेसरीज क्लस्टर" ही योजना रातवड येथे होण्याच्या अनुषंगाने महामंडळामार्फत या प्रकल्पाबाबत सविस्तर प्रस्ताव शासनास पाठविण्यात आला होता. या योजनेसाठी उद्योग राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नाने सुमारे 151 एकर जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ देण्याबाबत सकारात्मक आहे. आता महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत हा प्रस्ताव केंद्राच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या मान्यतेसाठी नुकताच पाठविण्यात आला आहे.
       रायगड जिल्ह्यात 82 हजारांहून अधिक चर्मकार समाज वास्तव्यास आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी आवश्यक कुशल कारागीर अधिक प्रमाणात उपलब्ध होण्यास मदत होईल. शिवाय या नियोजित उद्योग प्रकल्पासाठी मुंबई–गोवा महामार्गालगत ही जागा असल्यामुळे व दळणवळणाच्या सुविधांमुळे भविष्यात ही योजना यशस्वी ठरेल,असा विश्वास पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी दर्शविला आहे.
     जिल्ह्याच्या दृष्टीने विकासात्मक निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे या चिकाटी, दूरदृष्टी, सखोल अभ्यास तसेच सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रत्येक निर्णयात यशस्वी होताना दिसत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा