पाणी योजना पुर्ण होणार कधी ? श्रेय घेण्यासाठी धडपड ; तळ्यात पाणी पेटणार?


 विराज टिळक : तळा 

पाणी जीथे पाणी साठते ती जागा म्हणजे तळा...मात्र येथे नाव जरी तळे असले तरी पाणीची मात्र बोंब आहे. राजकिय उदासिनता आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे तळा तालुक्यातील जनतेला पाण्याअभावी गाव सोडण्याची वेेळ आली आहे. आता हेच बघा ना, कित्येक वर्षांनी एक पाणी योजना मंजूर झाली आहे तर सतरा पुढारी श्रेय घेण्यास पुढे आले आहेत. या वादात ही देखील योजना लाल फितीत अडकणार नाही ना अशी भिती तळावासीयांना वाटते आहे.

मुबलक पाणी नसल्याने तळा तालुक्याचे मोळे नुकसान होत आहे. तालुक्यातील कित्येक स्थानिक नागरिक रोजगाराचे साधन नसल्या कारणाने मोठ्या शहराकडे स्थलांतरित झाले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर आश्वासनाचा पाऊस पडतो. निवडणूका झाल्या कि कोरड्या विहीरीत पाणी शोधण्याची वेळ नागरीकांवर येते.

शासकीय, निमशासकीय किंवा खाजगी क्षेत्रात काम करणारा जवळपास 50 टक्केकर्मचारी वर्ग शहराबाहेर, तालुक्याच्या बाहेर राहत आहे. त्याचे कारण म्हणजे न मिळणार्‍या सोयी सुविधांचा अभाव. तालुक्याचे नेतृत्व करणार्‍या याचा विचार प्रामुख्याने करणे अपेक्षीत आहे. तळा बाजारपेठेवर मंदी आहे. माल वाहतुक करणारी वाहनेदेखील येईनाशी झाली आहेत.

काही मोठे व्यापारी राजकारणात देखील अग्रेसर आहेत. पण हि बाब अजून त्यांच्या लक्षात आलेली नाही. विरोधक म्हणून या मंडळींनी कधी कुठला मोर्चातर सोडाच पण साधे निवेदन दिल्याची देखील बातमी ऐकिवात नाही.

प्रमुख प्रश्न म्हणजे शहराचा पाणी प्रश्न आता हा पाणी प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचं चित्र दिसत आहे. आणि याच पाणी योजानेमुळे बाजारपेठेला पालवी फुटणार आहे.

जवळपास 9.5 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना शहरासाठी मंजूर झाली आहे. वावे धरणातून संपूर्ण तळा शहराला पाणीपुरवठा होणार असून लवकरच तळे शहरातील नागरिकांची तहान भागणार आहे. पण हीच योजना आता श्रेय वादाचे रूप घेताना दिसत आहे. हि योजना कोणी आणली? कोणी हिची संकल्पना मांडली? कोणामुळे हि योजना पूर्णत्वास जाणार असे असंख्य प्रश्न आता निर्माण झाले आहेत.

योजना श्रेय वादात न अडकता लवकरात लवकर पूर्ण करा अशी सामान्य जनतेची मागणी आहे. कारण या योजनेमुळे पुन्हा एकदा तळा शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहे. हि योजना सर्वानी एकत्रतीत पूर्ण करून त्यातल्या अडचणी सर्वानी मिळवून सोडवल्या तर तळे शहरातील नागरिकांची तहान खर्‍या अर्थाने भागणार आहे. त्यामुळे बाबांनो वाद बाजूला ठेऊन योजना पहिली पूर्ण करा आणि तळे रांची तहान भागवा जेणेकरून तळा शहराला आनंदाचे दिवस पाहायला मिळतील.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा